तेरा वर्षांच्या वर्गमैत्रिणीवर चौदा वर्षांच्या मुलाकडून अत्याचार

पिडीत मुलगी-आरोपी मुलगा एकाच शाळेतील विद्यार्थी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 मे 2025
मुंबई, – पुस्तक देण्याचा बहाणा करुन तेरा वर्षांच्या वर्गमैत्रिणीला घरी आणून तिच्यावर चौदा वर्षांच्या मुलाने लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी चौदा वर्षांच्या अल्पवयीन आरोपी मुलाविरुद्ध दहिसर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पिडीत मुलगी आणि आरोपी मुलगा एकाच शाळेत शिकत असून एकमेकांच्या परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

42 वर्षांचे तक्रारदार दहिसर येथे राहत असून टेलर म्हणून काम करतात. तेरा वर्षांची पिडीत त्यांची मुलगी असून ती दहिसर येथील एका खाजगी शाळेत शिकते. याच शाळेत आरोपी हादेखील शिकत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. मंगळवारी सायंकाळी त्याने पिडीत मुलीला पुस्तक घेण्याचा बहाणा करुन त्याच्या घरी बोलाविले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून ती त्याच्या घरी गेली होती. यावेळी त्याने तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तिच्या प्राव्हेट पार्टला दुखापत केली होती. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली होती.

या प्रकारामुळे तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. घरी आल्यानंतर तिने तिच्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ते तिला घेऊन दहिसर पोलीस ठाण्यात आले होते. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी आरोपी मुलाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची दहिसर पोलिसांनी गंभीर दखल घेत त्यांच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह जिवे मारण्याची धमकी देणे आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिडीत मुलीला मेडीकलसाठी पाठविण्यात आले असून आरोपी मुलाचीही लवकरच मेडीकल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page