मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2025
मुंबई, – स्वतच्या पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच पित्याने विनयभंग केल्याचा माणसुकीला काळीमा फासणारी घटना दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी 48 वर्षांच्या आरोपी पित्याला दहिसर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
48 वर्षांचा आरोपी दहिसर परिसरात राहत असून बळीत ही त्याची पंधरा वर्षांची मुलगी आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत ही मुलगी घरात एकटीच होती. यावेळी तिचे वडिल घरी आले आणि त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्याने तिच्या टी-शर्टमध्ये हात घालून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि घरातून निघून गेली. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र या घटनेने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिच्या पित्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यचा निर्णय घेतला होता.
दोन दिवसांपूर्वी ती दहिसर पोलीस ठाण्यात गेली आणि तिने घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या पित्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच गुरुवारी त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.