दोन दिवसांच्या नवजात अर्भकाला टाकून महिलेचे पलायन
महिलेवर गुन्हा दाखल; शताब्दी हॉस्पिटमध्ये उपचार सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – दोन दिवसांच्या नवजात अर्भकाला टाकून एका अज्ञात महिलेने पलायन केल्याची घटना दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पळून गेलेल्या महिलेविरुद्ध दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला आहे. दरम्यान या अर्भकावर कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अजीत मोरे हे नालासोपारा येथे राहत असून सध्या दहिसर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी पहाटे चार वाजता दहिसर येथील रावळपाडा, शिवाजी चौकाजवळील मोरेश्वर शाळेसमोर एक नवजात अर्भकाला टाकून महिलेने पलायन केल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी तिथे दोन दिवसांचे पुरुष जातीचे एक अर्भक सापडले. या अर्भकाला तातडीने पोलिसांनी कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. अर्भकाला जन्म देऊन त्याचे पालकत्व लपविण्याच्या उद्देशाने तसेच त्याचा सांभाळ न करता त्याचा परित्याग करण्याच्या उद्देशाने या महिलेने त्याला उघड्यावर बेवारसपणे टाकून पलायन केल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे या महिलेविरुद्ध पोलिसांनी ९३ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या मदतीने पोलिसांनी पळून गेलेल्या महिलेचा शोध सुरु केला आहे.