लखनो पोलिसांच्या नावाने महिलेची ऑनलाईन फसवणुक
सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्यांना मिरारोड येथून अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ डिसेंबर २०२४
मुंबई, – लखनो पोलिसांच्या नावाने एका महिलेची ऑनलाईन फसवणुक केल्याच्याा कटातील दोन आरोपींना मिरारोड येथून दहिसर पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. वरुणकुमार ओमप्रकाश तिवारी आणि सचिन सगननाथ मिश्रा अशी या दोघांची नावे आहेत. या टोळीने सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविल्याचा आरोप असून त्यांनी उघडलेले दहाहून अधिक खाती गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. या कटात इतर काही आरोपीची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
भावी भाविक शाह नावाची ३५ वर्षांची तक्रारदार महिला ही दहिसर येथे राहत असून अंधेरीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे तर तिचे पती भाविक हे सिव्हिल इंजिनिअर आहे. २८ नोव्हेंबरला ती तिच्या घरी होती. यावेळी तिला सारिका शर्मा नावाच्या एका महिलेचा कॉल आला होता. तिने ती दिल्ली टेलिकॉम कंपनीतून बोलत असल्याचे सांगून तिचा आधारकार्ड लिंक झाला आहे. याच आधारकार्डवरुन काही मोबाईल क्रमांकाचे रजिस्ट्रेशन झाले आहेत. या मोबाईलवरुन लखनो शहरातील तीन बँकेत तिच्या नावाने बँक खाती उघडण्यात आले आहे. त्यात अनेकांची फसवणुक झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लखनो पोलिसांकडून सुरु असल्याचे सांगून तिने तिचा कॉल दुसर्या व्यक्तीला फॉरवर्ड केला होता.
सुनिलकुमार नाव सांगणार्या या व्यक्तीने तो गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानेही तिला तीच माहिती सांगून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यांत तिला किमान दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते अशी भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. बोलण्यात गुंतवून त्याने तिला काही रक्कम ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याला काही रक्कम ट्रान्स्फर केली होती. दुसर्या दिवशी त्याने तिला पुन्हा कॉल करुन आणखीन पैशांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर तिच्यावर अटकेची कारवाई केली जाईल अशी धमकी दिली होती. यावेळी तिने त्याला पैसे देण्यास नकार देऊन तिचे बँक खाते ब्लॉक केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने दहिसर पोलिसांसह सायबर हेल्प लाईन क्रमांकावर तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच दहिसर पोलिसांनी तपास सुरु करुन तांत्रिक माहितीवरुन वरुणकुमार तिवारी आणि सचिन मिश्रा या दोघांना संशयित आरोपी म्हणून मिरारोड येथून ताब्यात घेतले. तपासात या दोघांचा गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला. ते दोघेही ऑनलाईन फसवणुक करणार्या सायबर ठगांना बँक खाती पुरविण्याचे काम करत होते. या दोघांनी आतापर्यंत दहाहून अधिक बँक खाती उघडले आहेत. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिसांनी संंबंधित बँक अधिकार्यांशी संपर्क साधून ते सर्व खाती बंद केले आहे.