अश्लील मॅसेज पाठवून ब्लॅकमेल करणार्या आरोपीस अटक
शंभरहून अधिक ईमेल व इंटाग्राम आयडी बनवून महिलांना केले टार्गेट
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 जून 2025
मुंबई, – अश्लील आणि घृणास्पद मॅसेजद्वारे ब्लॅकमेल करुन तरुणीसह महिलांचा मानसिक शोषण करणार्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करण्यात दहिसर पोलिसांना यश आले आहे. शुभमकुमार मनोजप्रसाद सिंग असे या 25 वर्षीय गुन्हेगाराचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवाशी आहे. त्याने आतापर्यंत शंभरहून अधिक बोगस वेगवेगळ्या तरुणीसह महिलांचे ईमेल आणि इंटाग्राम आयडी बनविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये साडेतेराशेहून अधिक तरुणीसह महिलांचे फोटोचे स्क्रिनशॉट मिळाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी सांगिले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार तरुणी दहिसर येथे राहत असून ती सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेते. जानेवारी महिन्यांत तिच्या नावाने सोशल मिडीयावर वेगवेगळ्या नावाने आयडी बनविण्यात आले होते. त्यात तिच्या नााने अश्लील आणि घृणास्पद मॅसेजसह स्टोरीज व्हायरल करण्यात आले होते. त्यामुळे तिची प्रचंड बदनामी झाली होती. अज्ञात व्यक्तीकडून तिची बदनामीसह मानसिक शोषण सुरु होते. या प्रकारानंतर तिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक् अशोक होनमाने यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला होता. तिच्या तक्रारीनंतर दहिसर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक ए. एम देसाई, सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा पाटील, पोलीस हवालदार अमीत पाटील, महिला पोलीस शिपाई सोनल म्हस्के, कुदळे, चिटणीस, श्रीकांत देशपांडे, चव्हाण, बिडकर यांनी तपास सुरु केला होता. तपासात अज्ञात व्यक्तीकडून विविध सोशल मिडीयावरुन तक्रारदार तरुणीची बदनामीकारक मजकूर व्हायरल करण्यात आले होते. त्यामुळे ज्या इंटाग्राम आयडीवरुन अश्लील मॅसेज पाठविण्यात आले होते, त्याची माहिती काढण्यात आली होती. या माहितीच्या आधारे या गुन्ह्यांतील आरोपी कर्नाटक राज्यात वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या संबंधित पथकाने कर्नाटक येथील बेल्लारी, सांदुर परिसरात शुभमकुमार सिंग या 25 वर्षांच्या तरुणाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच तक्रारदार कॉलेज तरुणीचे बोगस इंटाग्रामवर अकाऊंट उघडून तिच्या नावाने अश्लील आणि घृणास्पद मॅसेजसह स्टोरीज व्हायल केल्याची कबुली दिली. शुभमकुमार हा मूळचा बिहारच बागलपूरचा रहिवाशी असून सध्या तो सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. दिल्लीतील रेहान कॉम्प्युटर आयटी सेंटरमधून त्याने 1 जुलै 2015 ते 30 जून 2016 या कालावधीत सॉफ्ट स्किल कॉम्प्यिुंटर ट्रेनिंग प्रोग्रॉम हा डिप्लोमा केला होता. त्याच्या मोबाईलची पाहणी केल्यानंतर त्यात शंभरहून अधिक तरुणीसह महिलांच्या नावाने बोगस ई-मेल आडी बनविल्याचे तसेच वेगवेगळ्या महिलांचे अकराहून अधिक बोगस इंटाग्राम आयडी तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्याच्या मोबाईल गॅलरीत इतर वेगवेगळ्या तरुणीसहमहिलांचे साडेतेराशेहून अधिक फोटो स्क्रिनशॉट सापडले आहे.
तपासात शुभमकुमार हा तरुणीसह महिलांना इंटाग्रामवर फॉलो करुन, त्यांना अश्लील मॅसेज पाठवून ब्लॅकमेल करुन त्यांना न्यूड व्हिडीओ कॉल करण्यास प्रवृत्त करत होता. तसे न केल्यास त्यांचे फोटो आणि नाव वापरुन बोगस प्रोफाईल तयार करुन अश्लील मॅसेजसह स्टोरीज व्हायल करुन त्यांची बदनामीसह मानसिक शोषण करत होता. त्याने अशाच प्रकारे इतर काही तरुणीसह महिलांना ब्लॅकमेल केल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए. एम देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे हे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.