मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 डिसेंबर 2025
मुंबई, – चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी तिच्याच सावत्र पित्याने अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना दहिसर परिसरात घडली. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 43 वर्षांच्या आरोपी सावत्र पित्याला दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
14 वर्षांची बळीत मुलगी दहिसर येथे राहत असून आरोपी तिचा सावत्र पिता आहे. बुधवारी 10 डिसेंबरला घरात कोणीही नसताना त्याने तिच्याशी जवळीक साधून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या एक महिन्यांपासून तो तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करत होता. चार ते पाच वेळा त्याने तिच्या इच्छेविरुद्ध तिला मिठी मारणे, तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन अश्लील चाळे केले होते. वारंवार होणार्या या घटनेनंतर तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
गुरुवारी ती दहिसर पोलीस ठाण्यात गेली आणि तिने तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रारीवरुन तिच्या सावत्र पित्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी बळीत मुलीचा सावत्र पिता असून तो काहीच कामधंदा करत नसल्याचे सांगण्यात आले.