कारची बुलेटला धडक लागल्याचा आरोप करुन विदेशी साहित्य पळविले

24.53 लाखांचा मुद्देमाल पळविणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 जानेवारी 2026
मुंबई, – कारची बुलेटला धडक लागल्याचा आरोप करुन बुलेटवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने विदेशातून आणलेल्या मोबाईलसह मोबाईल अ‍ॅक्सेसरीज असा 24 लाख 53 हजार रुपयांचाा विदेशी मुद्देमाल पळवून नेल्याची घटना दहिसर चेकनाक्यावर घडली. याप्रकरणी पळून गेलेल्या दोन्ही आरोपीविरुद्ध दहिसर पोलिसांनी रॉबरीचा गुन्हा दाखल करुन सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने त्यांचा शोध सुरु केला आहे.

विजय बाळभाई पवार हे 38 वर्षांचे तक्रारदार मूळचे गुजरातच्या अहमदाबादचे रहिवाशी आहे. सध्या ते दहिसर येथील एम. के इंटरप्रायजेस कंपनीत कामाला आहेत. 1 डिसेंबरला कंपनीचे मालक जिगर प्रेम बडिया यांनी त्यांच्यासह त्यांची सहकर्मचारी अर्चना राजेश डिकोंडवार यांना हाँगकॉगला पाठविले होते. हाँगकाँगमध्ये त्यांनी मोबाईलसह मोबाईलचे काही अ‍ॅक्सेसरीज घेतले होते. हॉगकाँग विमानतळावर त्यांना त्यांच्यासोबत काम करणारा दिपक किशोरभाई बेलाडिया भेटला होता. त्यानंतर ते तिघेही 23 जानेवारीला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. विमानतळाबाहेर त्यांनी भाड्याने कार घेतली. ते तिघेही कारमधून ओवरीपाडा ब्रिजवरुन दहिसर येथील चेकनाका, सीएनजी गॅस स्टेशन, प्रभात इंडस्ट्रिजच्या दिशेने जात होते.

रात्री पावणेतीन वाजता अचानक बुलेटवरुन दोन तरुणांनी तुमच्या कारने त्यांच्या बुलेटला धडक दिली असून कार बाजूला घ्या असे सांगितले. त्यामुळे त्यांनी कार बाजूला घेतली होती. कारमधून उतरताच या दोघांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांनी कारच्या डिक्कीतून हाँगकाँगहून आणलेले मोबाईलसह मोबाईल अ‍ॅक्सेसरीज असा 24 लाख 53 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. या बॅगेत 2 लाख 85 हजार रुपयांचे तीन 17 प्रो आयफोन, दोन लाख रुपयांचे दोन 17 प्रोमॅक्स आयफोन, सहा लाख रुपयांचे लहान मेमरी कार्ड, बारा लाख रुपयांचे मोठे मेमरी कार्ड, 36 हजार 180 रुपयांचे पेनड्राईव्ह मेमरी कार्ड, 1 लाख 30 हजार 500 रुपयांचे आयफोन मोबाईल स्क्रिन, दिपक यांचा मोबाईल आदी मुद्देमाल होता.

कारने बुलेटला धडक दिल्याचा आरोप करुन या दोघांनी त्यांच्याशी वाद घालून त्यांच्याकडील मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच विजय पवार यांनी दहिसर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या आरोपीविरुद्ध पोलिसांनी रॉबरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयांचा तपास सुरु असून सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींची ओळख पटवून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page