दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहीत महिलेची आत्महत्या

आरोपी पतीसह सासूला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ एप्रिल २०२४
मुंबई, – दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या ज्योती ऊर्फ स्नेहा कैलास वडारी या १८ वर्षांच्या नवविवाहीत महिलेने सासरच्या मंडळीकडून होणार्‍या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिच्या पतीसह सासूविरुद्ध दहिसर पोलिसांनी हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. कैलास नरसिमलू वडारी आणि अनंतमा नरसिमलु वडारी अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन महिन्यांत स्नेहाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविल्याने तिच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसल्याचे बोलले जाते.

कर्नाटकचे रहिवाशी असलेले मनोजकुमार हनुमंता रेड्डी घाटकोपर परिसरात राहतात. ते मिळेल ते काम करतात तर त्यांची पत्नी हाऊसकिपिंगचे काम करते. सतरा वर्षांची मुलगी शिक्षण घेत असून मोठी मुलगी स्नेहा हिचा विवाह झाला आहे. ती सध्या दहिसर येथील केतकीपाडा, दुर्गाया चाळीतील रुम क्रमांक दोनमध्ये तिचा पती कैलास, दोन सासू अनंतमा आणि यादमा यांच्यासोबत राहत होती. तिचा पती वसईतील एका खाजगी कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून कामाला होता तर दोन्ही सासू घरगडी म्हणून काम करतात. २८ जानेवारी २०२४ रोजी तिचे कैलाससोबत दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने कर्नाटक येथील गावी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस ठिक गेले, मात्र नंतर तिची सासू तिचा क्षुल्लक कारणावरुन छळ करु लागली. तिने माहेरहून पतीच्या बाईकसाठी पैसे आणावेत, तसेच विविध कारण सांगून तिला पैसे आणण्यास दबाव टाकत होती. याच कारणावरुन तिचा सासूकडे छळ सुरु होता. याबाबत तिने तिच्या पतीला तक्रार केली होती, मात्र तो तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करुन त्याच्या आईचे समर्थन करत होता. अनेकदा ते दोघेही तिला जेवण न देता उपाशी ठेवत होते. लग्नाच्या काही दिवसांत या दोघांनी तिला हुंड्यावरुन क्रुर वागणुक देण्यास तसेच मानसिक व शारीरीक शोषण करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे स्नेहा ही प्रचंड मानसिक तणावात होती. याबाबत तिने तिच्या पालकांना ही माहिती सांगितली होती. मात्र प्रत्येक घरात अशा प्रकारच्या कौटुंबिक वाद होत असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. दुसरीकडे स्नेहाचा छळ सुरु राहिल्याने तिने मानसिक नैराश्यातून गुरुवारी दुपारी आपल्या राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा प्रकार नंतर निदर्शनास येताच तिच्या कुटुंबियांनी तिला तातडीने कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

याप्रकरणी मनोजकुमार रेड्डी यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत त्यांनी स्नेहाचा पती कैलास आणि सासू अनंतमा वडारी हे दोघेही तिचा मानसिक व शारीरिक शोषण करत होते. तिच्याकडे बाईकसह इतर कामासाठी सतत पैशांची मागणी करत होते. अनेकदा तिला जेवण न देता उपाशी ठेवत होते. सततच्या छळाला आणि क्रुर वागणुकीला कंटाळून तिने आत्महत्या केली होती. या आत्महत्येला तिचा पती आणि सासूच जाबबदार असल्याचा आरोप करुन त्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारींनतर पोलिसांनी पती कैलास आणि अनंमता वडारी या दोघांविरुद्ध हुंड्यासाठी सूनेचा मानसिक व शारीरिक छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page