मानसिक नैराश्यातून 72 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची आत्महत्या
इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 मे 2025
मुंबई, – गेल्या काही वर्षांपासून मानसिक नैराश्यात असलेल्या एका 72 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेने मंगळवारी दुपारी आत्महत्या केल्याची घटना दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. मरलेन मेनन असे या वयोवृद्ध महिलेचे नाव असून तिने तिच्या राहत्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले. तिच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे आत्महत्येमागील अधिकृत कारण समजू शकले नाही, मात्र पतीच्या निधनानंतर मरलेन या मानसिक तणावात होत्या. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली असावी असे स्थानिक रहिवाशांच्या जबानीतून माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
ही घटना मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता दहिसर येथील कांदरपाडा, न्यू हॅरीटेज अपार्टमेंटमध्ये घडली. याच अपार्टमेंटच्या बी विंगच्या फ्लॅट क्रमांक701 मध्ये मरलेन या एकांकी जीवन जगत होती. त्यांच्या पतीचे पंधरा वर्षांपूर्वी निधन झाले होते. या दोघांना मूळबाळ नव्हते. त्यात पतीच्या निधनानंतर त्या एकट्याच राहत होत्या. त्यातून तिला मानसिक नैराश्य आले होते. एकांकी जिवनाला त्या कंटाळून गेल्या होत्या. त्यांचे फारसे कोणी मित्र-मैत्रिणी नव्हत्या. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता मरलेन यांनी त्यांच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेतली होती. हा प्रकार समजताच स्थानिक रहिवाशांनी तातडीने तिला कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेची माहिती दुपारी पाऊणच्या सुमारास एमएचबी पोलिसांना समजली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मरलेन यांच्या घरी पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे तिने आत्महत्या का केली याबाबत खुलासा होऊ शकला नाही. मात्र स्थानिक रहिवाशांच्या जबानीतून मरलेन या त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर प्रचंड मानसिक तणावात होत्या. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने स्वतला संपविल्याचा संशय व्यक्त केला आहे. या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. मरलेन यांच्या आत्महत्येने न्यू हॅरीटेज सोसायटीच्या रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.