पिंपळेश्वर महादेव मदिरातील चोरीप्रकरणी आरोपीस अटक

चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 नोव्हेंबर 2025
मुंबई, – दहिसर परिसरातील पिंपळेश्वर महादेव मंदिरातील दानपेटीतील कॅश चोरीचा पर्दाफाश करण्यात दहिसर पोलिसांना यश आले असून चोरीनंतर पळून गेलेल्या मुख्य आरोपीस पोलिसांनी अटक केली. बादलकुमार रामतार दास असे या 20 वर्षांच्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दानपेटीतील आठ हजाराची कॅश आणि ट्रक-रिक्षाचे चार बॅटरी हस्तगत करण्यात पोलिसांना आले आहे. त्याच्या अटकेने अन्य एका गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

यातील तक्रारदार रमेश हिरा पांडे हे दहिसर येथे राहत असून याच परिसरात पिंपळेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराचे रमेश पांडे हे ट्रस्टी आहेत. गुरुवारी 20 रात्री नऊ वाजता मंदिर बंद झाले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी पावणेसात वाजता एक भाविक मंदिरात आला होता. यावेळी त्याला मंदिरात चोरी झाल्याचे दिसून आले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच मंदिराच्या ट्रस्टीसह इतर भाविकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मंदिरात तीन दानपोट्या होत्या. या तिन्ही दानपोट्या तोडून अज्ञात चोरट्याने आतील सुमारे आठ हजाराची कॅश चोरी केली होती. हा प्रकार उघडकीस येताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी मंदिराच्या वतीने रमेश पांडे यांनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला होता.

मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेने स्थानिक भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली हातेी. त्यामुळे त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दहिसर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे, ए. एम देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जिनपाल वाघमारे, पोलीस हवालदार अमीत पाटील, शहानवाज सय्यद, पोलीस शिपाई कपिल चौधरी, ओमकार राणे, महेंद्र महाले यांनी तपास सुरु केला होता.

परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने बादलकुमार दास या तरुणाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची आठ हजाराची कॅश जप्त केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ट्रक आणि रिक्षाचे चार बॅटरी हस्तगत करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्याने या बॅटर्‍या चोरी केल्याचे सांगितले. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याच्या अटकेने या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page