मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – मालाडच्या काका बारमध्ये सुरु असलेल्या छमछमचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश करुन बार मॅनेजरसह नऊजणांना अटक केली. अटकेनंतर या सर्वांना दिडोंशी पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. दुसर्या दिवशी त्यांना बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. या कारवाईत सात बारबालांची सुटका केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मालाड येथील पोतदार रोड, लक्ष्मी नारायण शॉपिंग सेंटरमध्ये काका नावाचे एक बार ऍण्ड रेस्ट्रॉरंट आहे. या बारमध्ये मुंबई पोलिसांना दिलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लघंन करुन विनापरवाना रात्री उशिरापर्यंत बारबालांना ग्र्राहकांसोबत अश्लील नृत्य करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती अंमलबजावणी विभागाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब कानवडे, पोलीस उपनिरीक्षक योगेश कन्हेरकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय चौधरी, पोलीस हवालदार जुवाटकर, पाटील, पोलीस शिपाई पाटसुपे, यादव, जगताप यांनी दिडोंशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल दळवी, पोलीस शिपाई गोरड, पोलीस हवालदार बोराटे, चव्हाण यांच्या मदतीने मंगळवारी रात्री उशिरा साडेबारा वाजता काका बारमध्ये अचानक छापा टाकला होता.
या कारवाईदरम्यान काही बारबाला ग्राहकांसोबत अश्लील नृत्य करताना तसेच ग्राहक त्यांच्यावर पैशांची उधळण करताना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी गायिका म्हणून काम करणार्या सात बारबालांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांची नावे आणि राहण्याचा पत्ता विचारुन त्यांना सोडून देण्यात आले. यावेळी बारचा मॅनेजर, कॅशिअर, पाच स्टिवर्ड-वेटर, दोन आर्केस्ट्रा कलाकार, बारा ग्राहक आदींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या सर्वांना पुढील कारवाईसाठी दिडोंशी पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच बारच्या मॅनेजरसह नऊजणांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एक लाख रुपयांची कॅश, मोबाईल, ऍम्प्लिफायर, स्पीकर, शूटीुंगचे मेमरी कार्ड असा १ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटकेनंतर या सर्वांना दुसर्या दिवशी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. काका बारमध्ये डान्स बारचा परवाना नसून तिथे मुंबई पोलिसांनी दिलेल्या सर्व नियमांचे उल्लघंन होत होते. काही बारबालांच्या मदतीने छमछम सुरु असल्याचे तपासात उघडकीस आले. या गुन्ह्यांत बारच्या मालकासह चालकांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले.