मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ डिसेंबर २०२४
मुंबई, – मुंबई शहरात ड्रग्ज पुरवठा करणार्या दाऊदच्या एका मुख्य हस्तकासह दोघांना अखेर एल. टी मार्ग पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. दानिश मर्चंट ऊर्फ दानिश चिकना आणि कादीर गुलाम शेख ऊर्फ कादीर फंटा अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अलीकडेच दानिशच्या एका ड्रग्ज बनविणारया कारखान्याचा मुंबई युनिटच्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला होता. या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत सहभागी झाला होता.
दानिश हा कुख्यात दाऊद इब्राहिमचा खास सहकारी म्हणून परिचित असून त्याच्यावर मुंबईतील ड्रग्ज विक्रेत्यांना ड्रग्ज पुरविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ड्रग्ज सिंडीकेटचा तो मुख्य आरोपी म्हणून ओळखला जातो. त्याने डोंगरी परिसरात ड्रग्जचा कारखाना सुरु होता. याबाबतची माहिती प्राप्त होताच एनसीबीच्या अधिकार्यांनी तिथे छापा टाकून या ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश केला होता. या कारवाईनंतर दानिश हा पळून गेला होता. अखेर पळून गेलेल्या दानिशला राजस्थान येथून या अधिकार्यांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत नंतर तो जामिनावर बाहेर आला होता.
नोव्हेंबर महिन्यांत मरिनड्राईव्ह परिसरात ड्रग्ज विक्रीसाठी काहीजण येणार असल्याची माहिती एल. टी मार्ग पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून मोहम्मद आशिकुर रेहमान याला अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी १४४ ग्रॅम वजनाचे ड्रग्जचा साठा जप्त केला होता. पोलीस कोठडीत असताना त्याने त्याला ते ड्रग्ज दानिश चिकना आणि कादिर शेख यांनी दिल्याची कबुली दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी या दोघांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असातना रेहान शकील अन्सारीसह दोघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी ५५ ग्रॅम वजनाचे ड्रग्ज जप्त केले होते.
या आरोपींच्या अटकेनंतर दानिश चिकना आणि कादिर शेख हे दोघेही पळून गेले होते. त्यांचा शोध सुरु असताना दानिश हा डोंगरी परिसरात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून दानिशसह कादिर शेख या दोघांना अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.