मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – घाटकोपर येथील दर्शन ज्वेलर्स दुकानात घुसून तीनजणांच्या टोळीने घातक शस्त्रांचा धाक दाखवून रॉबरीची केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या तिघांनी दुकानातील सुमारे तीन लाखांचे दागिने पळवून नेताना दुकानाच्या मालकावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन हवेत गोळीबार करुन दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात दर्शन मेटकरी हे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रॉबरीसह आर्म्स अॅक्ट कलमांतर्गत घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या तीनपैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु होती. त्यांच्या तिसर्या सहकार्याचा पोलीस शोध घेत आहेत.
दर्शन मेटकरी हे ज्वेलर्स व्यापारी असून त्यांच्या मालकीचे घाटकोपर येथील अमृतनगर परिसरात दर्शन ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता ते नेहमीप्रमाणे काम करत होते. याच दरम्यान त्यांच्या दुकानात दोन तरुण आले. या दोघांनी पिस्तूलसह अन्य घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडे पैशांसह सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली होती. याच दरम्यान त्यांचा तिसरा सहकारी दुकानात घुसला, त्यापूर्वी त्याने दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला होता. बॅगेत सोन्याचे दागिने भरल्यानंतर त्यांना दर्शन मेटकरी यांनी विरोध केला, यावेळी मिळेल तेवढे दागिने घेतल्यानंतर ते तिघेही पळू लागले,
त्यांचा दर्शन यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, यावेळी एकाने त्यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले तर दुसर्या आरोपीने पळून जाताना हवेत गोळीबार केला होता. या गोळीबाराच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण केले होते. तिघांपैकी दोनजण बाईकने तर तिसरा सहकारी पायी चालत पळून गेला. ही माहिती प्राप्त होताच घाटकोपर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या दर्शन यांना तातडीने जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
घातक शस्त्रांचा धाक दाखवून दर्शन ज्वेलर्समध्ये झालेली रॉबरी आणि गोळीबाराची घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला नाकाबंदीसह गस्त घालण्याचे आदेश दिले होते. याच नाकाबंदीदरम्यान पळून गेलेल्या दोन आरोपींना रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे काही सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या दोघांनाही गुरुवारी दुपारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवडी येथे 2 कोटी 29 लाखांचे सोन्याचे दागिने बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले होते. ही घटना ताजी असताना बुधवारी दर्शन ज्वेलर्समध्ये झालेल्या रॉबरीच्या घटनेने व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.