क्रेडिट लिमिट वाढवून देण्याचा बहाणा करुन ऑनलाईन फसवणुक

दिल्लीतील कॉलसेंटरचा पर्दाफाश करुन मुख्य आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 जून 2025
मुंबई, – क्रेडिट लिमिट वाढवून देण्याचा बहाणा करुन ऑनलाईन फसवणुक करणार्‍या दिल्लीतील एका कॉल सेंटरचा सायन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत एका मुख्य आरोपीस पोलिसांनी अटक केली. मनजीतकुमार महावीर सिंग असे या आरोपीचे नाव असून त्याचयाकडून पोलिसांनी आठ मोबाईल, आठ सिमकार्ड आणि फसवणुकीची चार लाख सतरा हजाराची कॅश जप्त केली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने शनिवार 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत इतर अकराजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, या सर्वांना नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत सायन परिसरात राहतात. 28 ऑगस्ट 2024 रोजी ते त्यांच्या घरी होते, यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो त्यांच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या क्रेडिट कार्डचे लिमिट वाढवून देतो असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डची माहितीसह पासवर्ड घेऊ त्याने त्यांची 4 लाख 54 हजार 717 रुपयांची ऑनलाईन फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार नंतर लक्षात येताच त्यांनी सायन पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.

या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना अशा प्रकारचे कॉल दिल्लीतून येत असून या टोळीने तक्रारदारासह इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. हाच धागा पकडून पोलिसांनी तपास ुसरु केला होता. आरोपींच्या अटकेसाठी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा शिर्के, पोलीस निरीक्षक नारायण मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय खाडे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश खामकर, पोलीस शिपाई कुंभार, जाधव, ठाकूर, पोलीस हवालदार ठोके आदीचे एक पथक दिल्लीला पाठविण्यात आले होते.

या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने दिल्लीतील एका बोगस कॉल सेंटरमध्ये छापा टाकला होता. या कारवाईत मनजीतकुमारसह इतर अकराजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत याच कॉल सेंटरमधून अनेकांना कॉल केले जात होते. बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करुन अनेकांना त्यांच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देतो असे सांगून ते संबंधित व्यक्तींचा विश्वास संपादन करत होते. त्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती घेऊन ऑनलाईन फसवणुक करत होते. या टोळीचा मनजीतकुमार हा मुख्य सूत्रधार होता. त्यामुळे त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले तर इतर अकराजणांची नावे आणि पत्ते घेतल्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर मनजीतकुमारला लोकल कोर्टात हजर करण्यता आले होते. यावेळी कोर्टाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यांतील आठ मोबाईलसह सिमकार्ड आणि फसवणुकीची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. प्राथमिक तपासात या टोळीने अनेकांना गंडाघातला आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील सोळा अधिक ऑनलाईन तक्रारी सायबर क्राईम पोर्टलवर दाखल आहेत. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष माहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page