मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 एप्रिल 2025
मुंबई, – जागेच्या वादातून उमेर सलीम शेख या 58 वर्षांच्या व्यक्तीची तीनजणांच्या टोळीने बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना गोवंडीतील देवनार परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना गोवंडीतून देवनार पोलिसांनी अटक केली. रमजान अब्दुल हमीद शेख ऊर्फ खोपडी, मुसा इमाम सय्यद आणि हासिम मुसा सय्यद अशी या तिघांची नावे आहेत. यातील रमजानविरुद्ध पंधरा वर्षांपूर्वी देवनार पोलीस ठाण्यात हत्येच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. अटकेनंतर या तिघांनाही शुक्रवारी लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना बुधवारी सकाळी पावणेअकरा वाजता गोवंडीतील इंदिरानगर पार्ट दोन, रेल्वे पटरीजवळील न्यू लिंबूनिया बाग परिसरात घडली. याच परिसरात मोहम्मद उमेर हा तरुण राहत असून तो चालक म्हणून काम करतो. उमेर सलीम शेख हे त्याचे वडिल असून तिथेच त्यांच्या मालकीची एक जागा आहे. याच जागेवरुन त्यांचे रमजानसोबत काही दिवसांपासून वाद सुरु होता. याच वादातून दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. यावेळी रमजानसह इतर दोघांनी उमेर यांना बेदम मारहाण केल होती. छातीवर जोरात ठोसे लगावल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती, त्यातच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच देवनार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मद उमेरच्या जबानीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना गोवंडीतून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही शुक्रवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.