मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जुलै 2025
मुंबई, – लग्न मोडले म्हणून एका 22 वर्षांच्या तरुणीवर तिच्याच परिचित तरुणाने ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना धारावी परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात सफरुलबानो अब्दुल रेहमान शेख हिच्या गळ्याला दुखापत झाली असून तिच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये प्राथमिक औषधोपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी अब्दुल मलिक शेख या 26 वर्षांच्या आरोपीविरुद्ध धारावी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना सोमवारी 7 जुलैला दुपारी एक वाजता धारावीतील अशोक मिल कंपाऊंडच्या आरएचएस इंटरप्रायजेस या कपड्याच्या दुकानात घडली. सफरुनबानो ही धारावीतील 60 फिट रोड, मुस्लिमनगर, निलकमल सोसायटीमध्ये तिच्या कुटुंबियांसोबत राहते. याच परिसरातील एका कपड्याच्या दुकानात ती कामाला आहे. काही महिन्यांपूर्वी तिच्या कुटुंबियांनी तिचे अब्दुलशी लग्न ठरविले होते. मात्र काही कारणास्तव तिने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांचे लग्न मोडले होते. त्याचा अब्दुलच्या मनात प्रचंड राग होता. सोमवारी दुपारी एक वाजता सफरुनबानो ही दुकानात काम करत होती. यावेळी तिथे अब्दुल आला आणि त्याने लग्न मोडल्याचा तिला जाब विचारला होता. त्यातून त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती.
रागाच्या भरात त्याने तिला आता तुला जिवंत सोडणार नाही असे सांगून तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केले होते. यावेळी तिने त्याला धक्का देऊन बाजूला केला. अब्दुलकडून स्वतची सुटका करुन ती दुकानाच्या बाहेर आली आणि तिने आरडाओरड करुन लोकांना जमा करण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान अब्दुल हा तेथून पळून गेला होता. रक्तबंबाळ झालेल्या सफरुनबानोला स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. ही माहिती मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी सफरुनबानो हिने दिलेल्या जबानीवरुन पोलिसांनी अब्दुल शेख याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटिव्ही उपलब्ध झाले असून फुटेजमध्ये अब्दुल हा सफरुनबानोशी वाद घालून तिच्यावर ब्लेडने हल्ला करत असल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.