धारावीत बॉम्बच्या निनावी कॉलमुळे तणावाचे वातावरण
धमकीचा कॉल करणार्या व्यक्तीची ओळख पटली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ जानेवारी २०२५
मुंबई, – धारावीतील राजीवनगर बॉम्बच्या निनावी कॉलमुळे रविवारी सकाळी परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धमकीचा कॉल करणार्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव नरेंद्र गणपत कावळे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे बॉम्ब असल्याचे कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती.
गेल्या काही महिन्यांत बॉम्बच्या निनावी कॉलमुळे मुंबई पोलिसांची चांगलीच धावपळ झाली होती. कॉलनंतर परिसरातील तपासणी केल्यानतर तो कॉल बोगस असल्याचे उघडकीस येत होते. त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलीस तपास करत होते. अशाच काही गुन्ह्यांत आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तरीही कॉल येणार्यांची संख्या कमी झाली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून अशा कॉलचे प्रमाण कमी झाले होते. मात्र शुक्रवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल करुन धारावीतील राजीवनगर परिसरात बॉम्ब ठेवला असल्याची माहिती सांगितली होती. या धमकीनंतर त्याने कॉल बंद केला होता. त्यानंतर ही माहिती कंट्रोल रुममधून धारावी पोलिसांना देण्यात आली.
या धमकीनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची तपासणी केली, मात्र पोलिसांना कुठेही संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यामुळे तो कॉल बोगस असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कॉल करणार्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना नरेंद्र कावळे या ४२ वर्षांच्या व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासात नरेंद्र हा धारावीतील बसडेपोसमोरील राजीवनगरात राहतो. त्याने यापूर्वीही मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल करुन बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. २०२२ साली त्याच्याविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर होता. त्यानंतर त्याने शुक्रवारी पुन्हा तो राहत असलेल्या परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.