धारावीतील खंडणी वसुलीच्या प्रकाराचा पर्दाफाश

दोन महिलांसह तोतया मनपा कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 डिसेंबर 2025
मुंबई, – धारावीतील छोट्या व्यावसायिकावर कारवाईची धमकी देऊन सुरु असलेल्या खंडणी वसुलीचा धक्कादायक प्रकाराचा धारावी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन महिलांसह महानगरपालिकेच्या चार तोतया कर्मचार्‍याविरुद्ध धारावी पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक करुन खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच हनुमंत नागप्पा कुचीकुर्वे नावाच्या एका 36 वर्षांच्या आरोपी तोतया कर्मचार्‍याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. याच गुन्ह्यांत दिपाली दिपक दळवी, मेघा सोनावणे व अन्य एका आरोपीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास शेलार यांनी सांगितले. या तिन्ही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

आबिद बिगन शेख हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत धारावीतील राजीव गांधी नगर, पिवळा बंगला बसस्टॉपजवळील आंबेडकर चाळीत राहतात. याच परिसरातील अकबर जनरल स्टोरसमोरच त्यांचा बॅग बनविण्याचा एक युनिट आहे. रविवारी दुपारी दिड वाजता ते त्यांच्या युनिटमध्ये त्यांच्या कर्मचार्‍यासोबत काम करत होते. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या भावाची मुले बाहेर खेळत होती. याच दरम्यान तिथे दिपाली दळवी आणि मेघा सोनावणे नावाच्या दोन महिला आल्या. त्या दोघीही आबिद शेख यांच्या युनिट कार्यालयात घुसले. त्यांनी त्यांना त्या दोघीही महानगरपालिकेतील कर्मचारी असल्याची बतावणी केली. त्यांच्या बॅग बनविण्याच्या युनिटमध्ये बालकामगारांना जबदस्तीने काम करण्यास प्रवृत्त केले जात असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार आहे.

या गुन्ह्यांत त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांनी प्रकरण मिटविण्यासाठी त्यांच्याकडे 25 हजाराची मागणी केली होती. कारवाईसह अटकेच्या भीतीने त्यांनी त्यांना 25 हजार रुपये देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला होता. त्याच दिवशी दिपाली, मेघासह इतर दोघांनी इतर छोट्या व्यावसायिकाच्या दुकानासह कारखान्यात कारवाईची धमकी देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसुली केली होती. सोमवारी दुपारी अडीरच वाजता दिपालीसह तिचा सहकारी हनुमंत कुचीकुर्वे पुन्हा त्यांच्या युनिटमध्ये आले होते. त्यांनी त्यांच्याकडे बॅगेची मागणी केली. मात्र त्यांनी त्यांना बॅग देण्यास नकार दिला. या नकारानंतर त्यांनी त्यांना पुन्हा कारवाईसह अटकेची धमकी दिली होती.

त्यांच्याविरुद्ध बालकामगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचा धमकीवजा इशारा दिला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी स्थानिक व्यावसायिकाकडे चौकशी केली होती. यावेळी याच टोळीने त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसुली केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या व्यावसायिकांनी स्थानिक लोकांच्या मदतीने या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दिपाली तेथून पळून गेली तर हनुमंतला लोकांनी ताब्यात घेतले.

ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विकास शेलार, पोलीस हवालदार दत्तात्रय वरखडे, पोलीस शिपाई उमेश सोयंके, बजरंग लांडगे, संतोष काकड यांनी घटनास्थळी धाव घेऊन हनुमंतला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत अशा प्रकारे खंडणी वसुली करणारी ही सराईत टोळी असल्याचे उघडकीस आले. ही टोळी महानगरपालिकेचे अधिकारी असल्याची बतावणी करुन कारवाई करुन व्यावसायिकाकडे प्रकरण मिटविण्यासाठी पैशांची मागणी करत होती.

या टोळीने आतापर्यंत अनेक व्यावसायिकाकडून लाखो रुपयांची खंडणी वसुल केल्याचे बोलले जाते. त्याच्या चौकशीत त्याच्या इतर तीन सहकारी दिपाली दळवी, मेघा सोनावणे व अन्य एका व्यक्तीचे नाव समोर आले होते. त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत. या चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक करणे, खंडणीसाठी धमकी देणे आदी कलमांतर्गत कारवाई केली आहे. अटकेनंतर हनुमंतला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page