मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ जुलै २०२४
मुंबई, – क्षुल्लक कारणावरुन दोन व्यक्तींमध्ये सुरु असलेल्या भांडणात मध्यस्थी करणे एका तरुणाच्या जिवावर बेतले. भांडणात मध्यस्थी करणार्या अरविंद हजारीलाल वैश्य या २३ वर्षांच्या तरुणाची दोघांनी तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना धारावी पोलिसांनी अटक केली. मोहम्मद नियाज इस्लाम शेख ऊर्फ अल्लू आणि मोहम्मद आरिफ अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना रविवारी रात्री सव्वादहा वाजता धारावीतील गांधीनगर खाडीकडे जाणार्या गल्लीत घडली. शैलेंद्रकुमार वैश्य हा धारावीतील राजीव गांधी नगर, जय भवानी चाळीत राहत असून मृत अरविंद हा त्याचा लहान भाऊ आहे. रविवारी रात्री उशिरा सिद्धेश आणि अब्बू यांच्या वडिलांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादात अरविंदने मध्यस्थी करुन त्यांच्यातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा मोहम्मद नियाजला राग होता. त्यामुळे त्याने अरविंदला भांडणात मध्यस्थी का केलीस असा जाब विचारुन त्याच्याशी भांडण सुरु केले होते. काही वेळानंतर मोहम्मद नियाजसह त्याचा मित्र मोहम्मद आरिफने अरविंदवर चाकूने वार केले होते. त्यात त्याच्या छातीला आणि पोटात गंभीर दुखापत झाली होती. जखमी झालेल्या अरविंदला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या शीव रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ही माहिती मिळताच धारावी पोलिसांनीद घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी शैलेंद्रकुमार वैश्य याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मोहम्मद नियाज आणि मोहम्मद आरिफ या दोघांविरुद्ध १०३ (२), ३५१ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. तपासात सिद्धेश हा याच परिसरात राहत असून त्याचे कटलरीचे दुकान आहे. त्याचे अब्बूसोबत भांडण झाले होते. या भांडणात अरविंदने मध्यस्थी केली होती. हीच मध्यस्थी तिच्या जिवावर बेतल्यचे बोलले जाते.