पूर्ववैमस्नातून तरुणाची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या
पिता-पूत्रांना अटक तर पळालेल्या आरोपीचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ जानेवारी २०२५
मुंबई, – पूर्ववैमस्नातून आदित्य श्रीकांत नारायणकर ऊर्फ सोन्या या २६ वर्षांच्या तरुणाची एकाच कुटुंबातील चौघांनी लाथ्याबुक्यासह तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची घटना धारावी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी पिता-पूत्रांना धारावी पोलिसांनी अटक केली. राकेश बाबू कुंचीकुरवे, सतीश बाबू कुंचीकुरवे, बाबू कुंचीकुरवे अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सतीश बाबू कुंचीकुरवे याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
ही घटना शनिवारी रात्री आठ वाजता धारावीतील संत ककैया मार्ग, शिवशक्तीनगर, गल्ली क्रमांक आठजवळ घडली. प्रिया सुनिल मैत्री ही तरुणी याच परिसरातील धारावी पोलीस ठाण्याच्या मागील साईबाबा नगरात राहते. मृत आदित्य हा तिचा भाऊ असून कुंचीकुरर्वे कुटुंबिय याच परिसरात राहतात. त्यामुळे ते एकमेकांच्या परिचित आहेत. आदित्य आणि कुंचीकुरर्वे यांच्यात पूर्वीचा जुना वाद होता. त्यातून शनिवारी रात्री आठ वाजता कुंचीकुरवे कुटुंबातील चौघांनी आदित्यला शिवशक्तीनगर गल्ली क्रमांक आठजवळ अडविले होते. पूर्वीच्या भांडणातून त्यांनी त्याच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. या वादानंतर त्यांनी त्याला बेदम मारहाण केली होती. काही वेळानंतर त्यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते.
या हल्ल्यात आदित्य हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे रक्तबंबाळ झालेल्या आदित्यला स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. मात्र तिथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे हल्ल्यानंतर चारही हल्लेखोर तेथून पळून गेले होते. ही माहिती प्राप्त होताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी प्रिया मैत्री हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कुंचीकुरवे कुटुंबातील चौघांविरुद्ध हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या बाबूसह त्याचे दोन्ही मुले राकेश आणि सतीश कुंचीकुरवे या तिघांना पोलिसांनी अटक केली तर सतीश या घटनेनंतर पळून गेला होता. अटकेनंतर या तिघांनाही रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.