भांडणानंतर मैत्री तोडली म्हणून 20 वर्षांच्या तरुणाची हत्या
हत्येच्या गुन्ह्यांत आरोपी मित्राला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2026
मुंबई, – भांडणानंतर मैत्री तोडली म्हणून आश्विन शिवकुमार नाडार या 20 वर्षांच्या तरुणाची त्याच्याच मित्राने तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची घटना धारावी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी मित्र आशिक असीम अख्तर खान याला धारावी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना सोमवारी 16 मार्चला सायंकाळी साडेपाच वाजता धाररावीतील गोपीनाथ कॉलनीच्या सार्वजनिक बाथरुमजवळ घडली होती. शेवंती शिवकुमार नाडार ही महिला तिच्या पती आणि तीन मुलांसोबत धारावीतील मुंकूंदनगर परिसरात राहते. तिचे पती वाहनचालक म्हणून काम करतात तर मोठा मुलगा अभिषेक हा कॉलेजमध्ये शिक्षण तर लहान मुलगा आश्विन हा काहीच काम करत नाही. याच परिसरात आशिक हा राहत असून तो आश्विनचा चांगला मित्र होता.
काही दिवसांपूर्वी या दोघांचे क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणानंतर आश्विनने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. त्याच्यासोबत मैत्री तोडली होती. भांडणानंतर आश्विन त्याच्यासोबत राहत नाही, बोलत नाही म्हणून त्याच्या मनात राग होता. सोमवारी सायंकाळी आश्विन हा गोपीनाथ कॉलनीतील बाथरुमजवळून जात होता. यावेळी तिथे आशिक आला आणि त्याने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्याच्याशी बोलणे टाळले होते.
त्याचा राग आल्याने त्याने त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्याच्यावर वार केल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. बेशुद्धावस्थेत त्याला तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी आशिक खानला पोलिसांनी अटक केली होती.
सुरुवातीला त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आश्विनच्या मृत्यूनंतर त्याच्याविरुद्ध आता हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.