धारावीत अज्ञात व्यक्तीची पेव्हर ब्लॉकने मारहाण करुन हत्या
हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या मारेकर्यांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मार्च 2026
मुंबई, – धारावी परिसरात एका 50 ते 55 वयोगटातील अज्ञात व्यक्तीची पेव्हर ब्लॉकने बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याप्रकरणी धारवी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या मारेकर्यांचा शोध सुरु केला आहे. मृत व्यक्तीची ओळख न पटल्याने या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही.
संजय माणिक कोळी हे दादरच्या नायगाव पोलीस वसाहतीत राहत असून मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या चार वर्षांपासून त्यांची नेमणूक धारावी पोलीस ठाण्यात आहे. रविवारी 22 मार्चला ते रात्रपाळी कर्तव्यावर हजर झाले होते. सोमवारी 23 मार्चला सकाळी पावणेआठ वाजता त्यांना पोलीस निरीक्षक संगीता माने यांनी कॉल करुन सायन-वांद्रे लिंक रोड, कलानगर जंक्शनकडून धारावी टी जंक्शनकडे जाणार्या इलेक्ट्रीक पोल फुटपाथवर एक तरुण बेशुद्धावस्थेत पडला असल्याची माहिती दिली होती. या माहितीनंतर संजय कोळी हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले होते.
घटनास्थळी पोलिसांना एक अज्ञात व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला पोलिसांनी तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तो बेशुद्धावस्थेत असल्याने त्याची पोलिसांना चौकशी किंवा जबानी नोंदविता आली नव्हती. उपचारादरम्यान सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तीचे वय अंदाजे 50 ते 55 असून त्याच्या डोक्याला, कपाळावर, कानाला गंभीर दुखापत झाली होती. त्याचे दोन्ही डोळे सुजलेले आणि काळे-निळे पडले होते. याप्रकरणी धारावी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला होता.
घटनास्थळी पोलिसांना एक पेव्हर ब्लॉक सापडले होते, त्याला रक्त लागले होते. दुसरीकडे पोलिसांना शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यक्तीची पेव्हर ब्लॉकने डोक्यात मारहाण करुन हत्या झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या अहवालानंतर पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली नसल्याने त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न सुरु केले आहे. त्याची ओळख पटल्यानंतर पुढील तपासाला वेग येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.