चोरीच्या उद्देशाने बेस्ट कंडक्टरवर चाकूने प्राणघातक हल्ला

चोरीसह हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० सप्टेंबर २०२४
मुंबई, – चोरीच्या उद्देशाने बसमध्ये चढलेल्या अचानक बेस्ट कंडक्टर अशोक काशिनाथ डगळे यांच्यावर चाकूने हल्ला करुन पलायन केले. याप्रकरणी चोरीसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या साबन मोबीन शेख या आरोपीस अवघ्या चार तासांत धारावी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला असून त्याला शनिवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी दुजोरा दिला आहे.

ही घटना शुक्रवारी २० सप्टेंबरला सकाळी नऊ ते सव्वानऊच्या सुमारास धारावीतील पिवळा बंगला, बसस्टॉपच्या कार्नरवरील धारावी डेपोच्या दिशेने जाणार्‍या वाहिनीवर घडला. अशोक डगळे हे बेस्ट कर्मचारी आहेत. शुक्रवारी सकाळी ते त्यांच्या बसवाहक सहकार्‍यासोबत सात क्रमांकाच्या पायधुनी ते विक्रोळीदरम्यान धावणार्‍या बसमध्ये कर्तव्य बजावत होते. ही बस नऊ ते सव्वानऊच्या सुमरारास धारावी डेपोकडे जाणार्‍या वाहिनीवरुन जात होती. याच दरम्यान एका तरुणाने बसमध्ये प्रवेश करुरन त्यांच्याकडील पैशांची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी त्याला प्रतिकार केला असता त्याने अशोक डगळे यांच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर त्यांच्याकडील पंधरा हजाराचा मोबाईल घेऊन आरोपी तरुण पळून गेला. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या अशोक डगळे यांना तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह रॉबरीचा गुन्हा नोंद होताच पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते, सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी मुरकुटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संगीता माने, गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास शेलार, पोलीस हवालदार दत्तात्रय वरखडे, पोलीस शिपाई राजेश शिंगटे, बजरंग लांडगे, योगेश सोनार यांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना अवघ्या चार तासांत साबन शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच अशोक डगळे यांच्यावर चोरीच्या उद्देशाने चाकूने हल्ला केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. त्याला शनिवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेने बसमधील प्रवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page