मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 मार्च 2025
मुंबई, – भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाशी तिघांनी हुज्जत घालून हल्ला केल्याची घटना धारावी परिसरात घडली. याप्रकरणी दोन बंधूंसह तिघांना धारावी पोलिसांनी अटक केली आहे. अमृत बसवराज आसनाळे, अविनाश बसवराज आसनाळे आणि रुपकर मल्लेश शेट्टी अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांच्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक विकास जयराम शेलार यांच्या हाताची करंगळी फॅक्चर झाली असून त्यांच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते.
विकास शेलार हे चुनाभट्टी परिसरात राहत असून धारावी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता ते त्यांच्या सहकार्यासोबत परिसरात गस्त घालत होते. यावेळी धारावीतील संत रोहिदास मार्ग, पारशी चाळीसमोरील गोल्डफिल्ड इमारतीजवळ काही तरुणांमध्ये भांडण सुरु असल्याची माहिती गस्त घालणार्या पोलीस पथकाला मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये प्राप्त झाली होती. या माहितीनंतर संबंधित पोलीस पथक तिथे रवाना झाले होते. यावेळी तिथे पोलीस हवालदार पवार उभे होते. तीन तरुण एका व्यक्तीला शिवीगाळ करुन मारहाण करत होते. त्यामुळे पोलीस पथकाने या तिघांनाही शांत राहण्याचे आवाहन करुन घरी जाण्यास सांगितले. यावेळी या तीनपैकी दोन तरुणांनी पोलीस उपनिरीक्षक विकास शेलार यांच्यासह इतर पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. आम्ही पोलीस आहोत, पोलिसांशी हुज्जत घालू नका, नाहीतर कारवाई केली जाईल असे सांगितले.
यावेळी एका तरुणाने पोलीस असला तर काय झाले असे बोलून त्यांच्याशी धक्काबुक्की केली. वारंवार शांत राहण्याचे आवाहन करुनही या तिघांनी पोलिसांनी हुज्जत घालून पोलिसांवर हल्ला केला होता. हाताने बेदम मारहाण करुन काठीने हल्ला केला होता. त्यात विकास शेलार यांना दुखापत झाली होती. तिन्ही तरुण आक्रमक होत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी बळाचा वापर करुन तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्यांची नावे अमृत आसनाळे, अविनाश आसनाळे आणि रुपकर शेट्टी असल्याचे उघडकीस आले.
तिन्ही आरोपी धारावीतील राजीव गांधी नगर, यलाप्पा चाळ व जय हनुमान चाळीतील रहिवाशी आहे. अमृत व अविनाश हे दोघेही बंधू असून अमृत खाजगी कंपनीत तर अविनाश हा चालक म्हणून करतो. रुपकरचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. विकास शेलार यांच्या तक्रारीवरुन या तिघांविरुद्ध धारावी पोलिसांनी कर्तव्य बजाविणार्या पोलिसांशी हुज्जत घालणे, शिवीगाळ करुन पोलिसांवर हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या तिघांनाही रात्री उशिरां पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.