वयोवृद्ध महिलेच्या घरात घुसून आठजणांच्या टोळीकडून रॉबरी
चाकूचा धाकावर जिवे मारण्याची धमकी देऊन केली लुटमार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ जानेवारी २०२५
मुंबई, – धारावी येथे एकाकी जीवन जगणार्या एका वयोवृद्ध महिलेच्या घरात घुसून आठजणांच्या टोळीने रॉबरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यात एका अल्पवयीन मुलीसह तीन तरुणी आणि चार तरुणांचा समावेश आहे. या टोळीने चाकूचा धाक दाखवून, जिवे मारण्याची धमकी देऊन सुमारे सव्वादोन लाखांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत या गुन्ह्यांतील सर्व आरोपींना अटक करण्यात धारावी पोलिसांना यश आले आहे. प्रिया गजानन सोनावणे ऊर्फ डोली, प्रगती रविंद्र हॉलमुगे, भावना भरत शेवाळे, निखील संजय पाटील, साहिल दिपक देवकर, सागर देवीस कर्माकर, अनिमेश अशोक कर्माकर अशी या सातजणांची नावे आहेत. यातील प्रिया, प्रगती, भावना आणि निखिल या चौघांनाही सोमवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टाने बुधवार १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित तीन आरोपी साहिल, सागर आणि अनिमेश यांना मंगळवारी दुपारी कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. एक मुलगी अल्पवयीन असून तिला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या आरोपींकडून चोरीचा काही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून उर्वरित मुद्देमाल लवकरच जप्त केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रविवारी सायंकाळी घडलेल्या या रॉबरीच्या घटनेने धारावीतील स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना रविवारी सायंकाळी सव्वाचार ते साडेचारच्या सुमारास धारावीतील कोळीवाडी, दत्त मंदिराजवळील धारावी-कोळीवाडा परिसरात घडली. या परिसरातील ई-१९६ मध्ये निर्मला सुभाष कोळी ही ७० वर्षांची वयोवृद्ध महिला राहते. रविवारी सायंकाळी ती तिच्या राहत्या घरी झोपली होती. यावेळी तिच्या घरात दोन अज्ञात तरुणींनी प्रवेश केला. काही कळण्यापूर्वीच या दोन्ही तरुणींनी तिच्या तोंडात बोळा कोंबून नंतर डोळ्यात मिरचीची पूड टाकून तिला चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर या तरुणींनी त्यांच्या इतर सहकार्यांच्या मदतीने निर्मला कोळी हिच्या अंगावरील, कपाटातील विविध सोन्याचे दागिने, चौदा हजाराची कॅश असा दोन लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. काही वेळानंतर निर्मला कोळी यांनी स्वतची सुटका केली होती.
तिच्याकडून स्थानिक रहिवाशांना हा प्रकार समजताच त्यांनी धारावी पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी निर्मला कोळी यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध १२३, १२७ (२), १२७ (७), ३०६ (९), ३११, ३५२ ३५१ (२), ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी धारावी पोलिसांना आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजवरुन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी प्रिया सोनावणे, प्रगती हॉलमुगे, भावना शेवाळे आणि निखिल पाटील या चौघांनाही काही तासांत चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यानंतर या चौघांनाही पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना बुधवार १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांच्या चौकशीतून इतर चौघांची नावे समोर आले होते. त्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश होता. या मुलीसह तिचे तीन सहकारी साहिल देवकर, सागर कर्माकर, अनिमेश कर्माकर यांना सोमवारी पोलिसांनी अटक केली. या तिघांनाही मंगळवारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे तर अल्पवयीन मुलीला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.