कारखान्यात घुसून बहिणीच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या
हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – धारावीतील एका गार्मेट कारखान्यात घुसून बहिणीचा प्रियकर अरमान रमजान शहा या 23 वर्षांच्या तरुणाची त्याच्याच परिचित साहिल दिनेश कुमार याने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या साहिलला धारावी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने 15 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र पोलिसांनी अधिकृतपणे काहीही सांगण्यास नकार दिला.
ही घटना बुधवारी 8 ऑक्टोंबरला धारावीतील मेन रोड, पुनावाला चाळ, कारखाना शॉप क्रमांक डीईटी सहा, प्लॉट क्रमांक 262 मध्ये घडली. अश्रम मोहम्मद मतीन शेख हे व्यावसायिक असून ते धारावीतील पुनावाला चाळीत राहतात. त्यांच्या मालकीचे तिथे एक गार्मेट कारखाना असून तिथे काही कामगार कामाला आहेत. त्यात अरमान याचा समावेश होता. बुधवारी सायंकाळी सव्वासात वाजता ते त्यांच्या कामगारासोबत कारखान्यात काम करत होते. याच दरम्यान तिथे साहिल आला. त्याने अरमानला बाजूला नेले.
काही कळण्यापूर्वीच त्याने त्याच्याकडील मिरचीची पावडर त्याच्या डोळ्याात टाकली. त्यामुळे अरमानला डोळ्याला दुखापत झाली होती, तो डोळे चोळत असताना अचानक साहिलने खिशातून चाकू काढून त्याच्या बरगडीवर वार करण्यास सुरुवात केली होती. त्यात अरमान हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे अश्रम शेख यांच्यासह इतर कामगारांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याने त्याच चाकूचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी देत तेथून पळ काढला होता. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांच्यासह धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या अरमानला तातडीने पोलिसांनी जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच उपचार सुरु असताना अरमानला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी अश्रम शेख यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी साहिल दिनेश कुमार याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांच्या पथकाने पळून गेलेल्या साहिलला काही तासांत अटक केली.
प्राथमिक तपासात अरमान आणि साहिल हे दोघेही मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहेत. सध्या ते दोघेही त्यांच्या कुटुंबियासोबत धारावी परिसरात राहत होते. अरमानचे साहिलच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती अलीकडेच साहिलला समजली होती. त्याचा त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यातून त्याने अरमानचा काटा काढायचे ठरविले होते. ठरल्याप्रमाणे बुधवारी सायंकाळी तो अरमान काम करत असलेल्या गार्मेट कारखान्यात गेला आणि त्याने त्याची चाकूने भोसकून हत्या केली होती.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला बुधवार 15 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून गुन्ह्यांतील चाकू पोलिसांनी अद्याप हस्तगत केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.