२० लाखांच्या हिर्‍यांच्या अपहारप्रकरणी दलालास अटक

गुन्हा दाखल होताच दिड महिन्यांपासून फरार होता

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ जुलै २०२४
मुंबई, – विक्रीसाठी दिलेल्या सुमारे वीस लाखांचा अपहार करुन फसवणुक करणार्‍या हिरे दलालास दहिसर पोलिसांनी अटक केली. मित दिपक शहा असे या दलालाचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो गेल्या दिड महिन्यांपासून फरार होता. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मीतने तक्रारदारासह इतर काही व्यापार्‍यांची अशाच प्रकार फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

भूपतभाई कानूभाई राजानी हे हिरे व्यापारी असून ते दहिसर येथे राहतात. गेल्या २३ वर्षांपासून ते हिर्‍यांची खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. दहिसर येथे त्यांची स्वतची एक कंपनीसह कारखाना आहे. याच कारखान्यात हिर्‍यावर प्रक्रिया करुन नंतर त्याची विक्री केली जाते. गेल्या वर्षी मे महिन्यांत त्यांची मीत शहाशी ओळख झाली होती. तो हिर्‍यांची दलालीचे काम करत होता. त्याच्या परिचित अनेक हिरे व्यापारी असून त्यांच्या हिर्‍यांचा चांगली किंमत मिळवून देतो असे सांगून त्याने त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२३ रोजी त्याने त्यांच्याकडून साहिल चौक्सी या व्यापार्‍याला विक्रीसाठी २० लाख ५० हजार रुपयांचे हिरे घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हिर्‍यांचे पेमेंट केले नाही किंवा हिरे परत केले नव्हते. विचारणा केल्यानंतर तो बंगलोरला असून एक महिन्यानंतर मुंबईत येणार असल्याचे सांगत होता. मात्र एक महिना उलटूनही त्याने पेमेंट केले नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे हिर्‍यांची मागणी सुरु केली होती. सततच्या मागणीनंतर मीतने त्याचा मोबाईल बंद केला होता. त्याच्या वाळकेश्‍वर येथील घरी गेल्यानंतर त्यांना मीत हा जानेवारी २०२४ पासून घरी आला नव्हता. तो कुठे आहे याची त्याच्या वडिलांसह पत्नीला काहीच माहिती नव्हती.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी जून महिन्यांत मीतसह अन्य एका व्यापार्‍याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ओम ज्वेलर्सचे मालक साहिल आणि मीत शहा या दोघांविरुद्ध दहिसर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच मीतचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. याच गुन्ह्यांत गेल्या दिड महिन्यांपासून फरार असलेल्या मीत शहाला अखेर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मीतने अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्‍यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page