1.56 कोटीच्या हिर्यांचा अपहारप्रकणी व्यापार्याला अटक
दुसरा बंधू फरार असल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 मार्च 2025
मुंबई, – विक्रीसाठी घेतलेल्या 1 कोटी 56 लाखांच्या हिर्यांचा अपहार करुन दोन हिरे व्यापार्यांची फसवणुक केल्याप्रकरणी चिराग त्रिकमभाई विराडिया या हिरे व्यापार्याला शनिवारी बीकेसी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याचा भाऊ योगेश त्रिकमभाई विराडिया याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोन बंधूंनी अनेक हिरे व्यापार्याकडून कोट्यवधी रुपयांचे हिरे क्रेडिटवर घेऊन त्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे चिरागच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
प्रितेश विनोदभाई शाह हे हिरे व्यापारी असून ते गिरगाव येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांची मारुती जेम्स नावाची एक कंपनी असून याच कंपनीत त्यांच्यासह इतर भागीदार आहेत. या कंपनीचे वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये एक कार्यालय आहे. याच कार्यालयातून त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार चालते. त्यांचे महेशभाई भवानभाई परमार हे व्यावसायिक मित्र असून त्यांची राजेश एक्सपोर्ट नावाची एक कंपनीआहे. त्यांचाही हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचा परिचित हिरे ब्रोकर दिनेश सवानी यांनी त्यांची चिराग आणि योगेश विराडिया यांच्याशी ओळख करुन दिली होती. या दोघांची श्री जेम्स नावाची एक कंपनी असून ते दोघेही हिरे खरेदी-विक्रीचे दलालीचे काम करत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे हिरे खरेदी करणारी एक चांगली ग्राहक कंपनी आहे. त्यामुळे त्यांना हिर्यांची गरज असून व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या हिर्यांचे पेमेंट केले जाईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे प्रितेश शाह आणि महेशभाई परमार यांनी या दोघांनाही 420 कॅरेटचे 1 कोटी 56 लाख 82 हजार रुपयांचे हिरे क्रेडिटवर दिले होते. हा संपूर्ण व्यवहार 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2025 या कालावधीत झाला होता.
चार दिवसांत पेमेंट करण्याचे आश्वासन देऊन या दोघांनी पेमेंट केले नव्हते किंवा क्रेडिटवर घेतलेले हिरे परत केले नव्हते. त्यामुळे या दोघांनी त्यांच्याकडे विचारणा सुरु केली होती. मात्र चिराग आणि योगेश हे दोघेही विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. या दोघांनी क्रेडिटवर घेतलेल्या हिर्यांची परस्पर विक्री करुन त्यांच्या पेमेंटचा अपहार करुन फसवणुक केली होती. त्यानंतर ते दोघेही मोबाईल बंद करुन पळून गेले होते. चौकशीदरम्यान विराडिया बंधूंनी त्यांच्यासह इतर काही हिरे व्यापार्याकडून कोट्यवधी रुपयांचे हिरे विक्रीसाठी क्रेडिटवर घेतले होते, मात्र कोणालाही पेमेंट किंवा हिरे परत केले नव्हते. या सर्वांचे हिरे घेऊन ते दोघेही पळून गेले होते. हा प्रकार लक्षात येताच प्रितेश शाह यांनी बीकेसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर चिराग आणि योगेश विराडिया यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. ते दोघेही मालाडच्या अप्पर गोविंदनगर, धु्रव हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहत असून फसवणुकीनंतर ते दोघेही त्यांच्या घरातून पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना शनिवारी चिरागला अटक केली. चौकशीत त्याने या दोन्ही हिरे व्यापार्यासह इतर व्यापार्यांची फसवणुक केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचा भाऊ योगेश हा पळून गेला असून त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.