30 लाखांच्या हिर्यांच्या अपहारप्रकरणी आरोपीस अटक
गुन्हा दाखल होताच गेल्या नऊ महिन्यांपासून फरार होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – विक्रीसाठी क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे तीस लाख रुपयांच्या हिर्यांच्या अपहारप्रकरणी निकुंज आश्विन संघानी नावाच्या एका आरोपीस बीकेसी पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. निकुंज हा तक्रारदाराचा माजी कर्मचारी असून सध्या तो हिरे दलालीचे काम करत होता. त्याच्यासह त्याच्या इतर सहकार्याने अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्यांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले असून त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून फसवणुकीचे अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कृतिक किरणकुमार रोकाणी हे हिरे व्यापारी आहेत. ते सध्या कांदिवली परिसरात राहत असून त्यांचा वांद्रे येथील बीकेसी डायमंड मार्केटमध्ये हिरे विक्रीचा व्यवसाय आहे. तिथे त्यांची ई-47 नावाची एक डायमंड खरेदी-विक्रीचे कार्यालय आहे. 2023 रोजी त्यांच्याकडे निकुंज संघानी हा हिरे तपासणी करण्याच्या कामाला लागला होता. वर्षभर काम केल्यानंतर त्याने नोकरी सोडली होती. त्यानंतर तो हिरे दलालीचे काम करु लागला होता. त्याने त्यांच्याकडे काम केल्याने तो त्यांच्या परिचित होता. सप्टेंबर 2024 रोजी निकुंज हा त्यांच्या कार्यालयात आला होता. त्याच्याकडे एक पार्टी असून त्यांना हिर्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी त्याला क्रेडिटवर हिरे द्यावे अशी विनंती केली होती. त्याच्यावर विश्वास ठेवून कृतिक रोकाणी यांनी त्याला 30 लाख रुपयांचे 138 कॅरेटचे हिरे दिले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हिर्यांचे पेमेंट केले नाही किंवा हिरे परत आणून दिले नव्हते. त्यामुळे ते त्याला सतत कॉल करुन विचारणा करत होते. मात्र निकुंज त्यांना प्रत्येक वेळेस वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. विक्रीसाठी क्रेडिटवर घेतलेल्या तीस लाखांच्या निकुंजने अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर निकुंज संघानीविरुद्ध पोलिसांनी हिर्यांचा अपहारासह फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता.
गेल्या नऊ महिन्यांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपासात त्याने कृतिक रोकाणी यांच्या तीस लाखांच्या हिर्यांचा अपहार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यासह त्याचे इतर दलाली करणार्या मित्रांनी अशाच प्रकारे काही हिरे व्यापार्यांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.