क्रेडिटवर घेतलेल्या 53 लाखांचे हिरे घेऊन व्यापार्याचे पलायन
आरोपी व्यापार्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2025
मुंबई, – क्रेडिटवर विक्रीसाठी घेतलेल्या सुमारे 53 लाखांचे हिरे घेऊन एका हिरे व्यापार्याने पलायन केले. हेमांग महेश सोनी असे या व्यापार्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. प्राथमिक तपासात हेमांगने मार्केटमधील अनेक हिरे व्यापार्याकडून हिरे घेऊन पेमेंट किंवा हिरे परत न करता संबंधित हिरे व्यापार्यांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
निशांत महेश पटेल हे प्रार्थना समाज परिसरात राहत असून लक्ष्मी डायमंड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतात. ही कंपनी हिर्यांची खरेदी-विक्री करत असून कंपनीचे मुख्य कार्यालय वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्स येथे आहे. अशोकभाई गजेरा हे त्यांचे मालक असून त्यांनी त्यांना हिर्यांच्या खरेदी-विक्रीचे सर्व अधिकार दिले आहेत. हेमांग सोनी हा हिरे व्यापारी असून त्याची ओरियन डायमंड नावाची एक कंपनी आहे. ते त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून ओळखतात. त्यांच्यासोबत त्यांच्या कंपनीचे अनेकदा हिर्यांचा व्यवहार झाला होता. व्यवहारात चोख असल्याने त्यांना हेमांगवर विश्वास होता.
गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत हेमांग हा त्यांच्या कार्यालयात आला होात. त्याच्याकडे एक चांगली ग्राहक कंपनी असून त्यांना हिर्यांची गरज आहे असे सांगून निशांत पटेलकडे क्रेडिटवर काही हिर्यांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला 12 ऑक्टोंबरला 24 लाखांचे तर 22 ऑक्टोंबरला 29 लाखांचे हिरे झांगड पावती बनवून दिले होते. सात दिवसांचे हिर्यांचे पेमेंट किंवा हिरे परत करण्याचे त्याने त्यांना आश्वासन दिले होते. मात्र एक महिना उलटूनही त्याचा काही प्रतिसाद आला नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याला कॉल केला होता, यावेळी हेमांगने लवकरात लवकर पेमेंट करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र बराच कालावधी होऊन त्याने पेमेंट केले नाही किंवा क्रेडिटवर घेतलेले हिरे परत नव्हते. कॉल केल्यानंतर तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद ठेवला होता. त्यामुळे त्यांनी हेमांगविषयी मार्केटमध्ये चौकशी केली होती. यावेळी त्यांना हेमांगने अनेक हिरे व्यापार्याकडून क्रेडिटवर हिरे घेतले होते, मात्र कोणालाही पेमेंट केले नव्हते. तसेच त्यांचे हिरे परत केले नव्हते. त्यांचीही हेमांगने हिरे घेऊन फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच दोन दिवसांपूर्वी निशांत पटेल यांनी कंपनीच्या वतीने बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हेमांग सोनीविरुद्ध पोलिसांनी हिर्यांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.