५० लाखांचे क्रेडिटवर घेतलेले हिरे घेऊन दलालांचे पलायन
वांद्रे येथील घटना; दोन्ही हिरे दलालाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ मे २०२४
मुंबई, – सुमारे ५० लाख रुपयांचे क्रेडिटवर घेतलेले हिरे घेऊन दोन्ही दलालांनी पलायन केल्याची घटना वांद्रे येथील बीकेसी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन्ही हिरे दलालाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. लक्ष बेद ऊर्फ सौरभ आणि श्रेयांस बेद अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे राजस्थानचे रहिवाशी आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
व्यवसायाने हिरे व्यापारी असलेले विवेक क्रांतीचंद्र धडा हे त्यांच्या कुटुंबियासोबत ब्रिचकॅण्डी परिसरात राहतात. त्यांचे वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये पी. सी डायमंड नावाची एक कंपनी आहे. त्यांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. भारत डायमंड बोर्समध्येच लक्ष बेद हा हिर्यांच्या दलालीचे काम करत असल्याने ते त्याला गेल्या पंधरा वर्षांपासून ओळखतात. त्याच्यासोबत त्यांनी अनेकदा हिर्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. व्यवहारात प्रामाणिक असल्याने त्यांचा लक्षवर प्रचंड विश्वास होता. श्रेयांस हा त्याचा नातेवाईक असून तोदेखील या व्यवसायाशी संबंधित होता. त्यानेच लक्षची ओळख तेथील हिरे व्यापार्यांशी करुन दिली होती. फेब्रुवारी २०२४ रोजी त्याने त्यांच्याकडून काही क्रेडिटवर हिरे देण्याची विनंती केली होती. त्याच्याकडे एक पार्टी आली असून त्यांना तातडीने हिर्यांची गरज असल्याचे सांगितले होते. काही वेळानंतर श्रेयांसने लक्षला हिरे देण्यास सांगून त्यांचा एक टक्का कमिशन बाजूला ठेवण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी लक्षला ५० लाख ७५ हजार रुपयांचे हिरे क्रेडिटवर दिले होते.
पंधरा दिवसांत पेमेंट किंवा हिरे परत करण्याचे आश्वासन या दोघांनी दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी पेमेंट केले नाही किंवा क्रेडिटवर दिलेले हिरे परत केले नव्हते. हिरे घेताना त्यांनी त्यांना काही धनादेश दिले होते, त्यामुळे ते धनादेश बँकेत टाकले होते. मात्र बँकेतून त्यांना एक पत्र देण्यात आले होते. त्यात संबंधित बँक खात्याचे व्यवहार बंद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. या घटनेनंतर त्यांनी श्रेयांसला कॉल केला असता त्याने लक्ष हा त्याचा नातेवाईक असून त्याच्याकडून लवकरच पेमेंट मिळेल. तो चांगला माणुस आहे, त्याच्याकडून तुमची फसवणुक होणार नाही असे सांगितले. मात्र तीन उलटूनही त्यांनी पेमेंट केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी लक्ष बेद आणि श्रेयांस बेद या दोघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बेद बंधू मूळचे राजस्थानच्या जयपूरचे रहिवाशी आहेत. फसवणुकीनंतर ते राजस्थानला पळून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी बीकेसी पोलिसांची एक टिम लवकरच राजस्थानला रवाना होणार आहे.