पाहण्यासाठी घेतलेला हिर्याची अदलाबदल करुन फसवणुक
1.70 कोटीच्या अपहारप्रकरणी तीन व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2025
मुंबई, – पाहण्यासाठी घेतलेल्या 1 कोटी 70 लाखांच्या हिर्याची अदलाबदल करुन एका हिरे व्यापार्याची तिघांनी फसवणुक केल्याची घटना वांद्रे येथील बीकेसी परिसरात घडली. याप्रकरणी तिन्ही हिरे व्यापार्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रितेश एच. शाह, धनश्याम रमणिकभाई तागडिया आणि भरत मंजीभाई गंगाणी अशी या तिघांची नावे असून ते तिघेही ट्रस्ट ज्वेल्स कंपनीचे संचालक आहेत. या घटनेनंतर ते तिघेही पळून गेले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. फसवणुकीसाठी या तिघांनी भारत डायमंड बोर्समध्ये एक कार्यालय भाड्याने घेतले होते, फसवणुकीनंतर कार्यालय रिकामे करुन ते तिघेही पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सेतुल चंद्रकांत मोदी हे नेपेयन्सी रोड परिसरात राहत सून हिरे व्यापारी आहेत. त्यांची पार्टनरशीपमध्ये अक्षत एम्पेक्स नावाची एक कंपनी असूनया कंपनीचे वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये एक कार्यालय आहे. 8 फेब्रुवारीला त्यांचा सेल्स मॅनेजर कल्पेश घोघारी यांना धनश्याम तागडिया याने कॉल करुन त्याचे भारत डायमंड बोर्समध्ये कार्यालय असून त्याला काही हिरे पाहिजे असल्याचे सांगितले. त्यामुळे कल्पेश हे 1 कोटी 70 लाखांचे हिरे घेऊन त्याच्या कार्यालयात गेले होते. हिर्यांची पाहणी केल्यानंतर काही वेळानंतर त्याने ते हिरे कल्पेशला परत केले होते. 26 फेब्रुवारीला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन धनश्याम तागडियाने त्यांच्याकडून घेतलेला हिरा तपासून घ्या. त्याने हिर्याची अदलाबदली करुन खर्या हिर्याच्या जागी त्यांना बोगस हिरा दिला आहे अशी माहिती दिली होती.
या माहितीने सेतुल मोदी यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी त्या हिर्याची तपासणी केली होती. त्याचा अहवाल नंतर त्यांना प्राप्त झाला. त्यात तो हिरा नैसर्गिक नसून सीव्हीडी असल्याचे नमूद करण्यात आले होते. अशाच प्रकारे धनश्याम तागडिया यांनी प्रितेश शाह आणि भरत गंगानी यांनी संगनमत करुन त्यांच्याकडील 1 कोटी 70 लाखांच्या हिर्याची अदलाबदल करुन खर्या हिर्याचा अपहार करुन त्याजागी बोगस हिरा देऊन त्यांची फसवणुक केली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन पाहणी केली असता धनश्याम तागडियाने ते कार्यालय काही दिवसांपूर्वीच रिकामे केल्याचे दिसून आले. या घटनेनंतर धनश्याम हा इतर दोन्ही आरोपीसोबत पळून गेले होते. त्यांच्या मोबाईल संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांचे मोबाईल बंद होते.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच सेतुल मोदी यांनी बीकेसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रितेश शाह, धनश्याम तागडिया आणि भरत गंगाणी या तिघांविरुद्ध पोलिसांनी हिर्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.