हिरे व्यापार्‍याच्या 5.36 कोटीच्या हिर्‍यांचा अपहार

अमेरिकेतील तीन हिरे व्यापार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 एपिल 2025
मुंबई, – वांद्रे येथील बीकेसी परिसरातील हिरे व्यापार्‍याच्या 5 कोटी 36 लाख रुपयांच्या हिर्‍याचां अपहार करुन अमेरिकेतील तीन हिरे व्यापार्‍यांनी फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिन्ही हिरे व्यापार्‍याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आशिष जयवंत सोनी, जयवंत सोनी आणि चितन अरविंद सोनी अशी या तिघांची नावे आहेत. ते तिघेही सध्या अमेरिकेत वास्तव्यास असल्याने भारतात आल्यानंतर त्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

धनश्याम नानजीभाई पटेल हे हिरे व्यापारी असून ते योगी स्टार एलएलपी या खाजगी हिरेसंबंधित एका खाजगी कंपनीत पार्टनर म्हणून काम करतात. या कंपनीचे वांद्रे येथील बीकेसी परिसरात एक कार्यालय आहे. याच कार्यालयात ते हिर्‍यांची खरेदी-विक्री करतात. त्यांचा व्यवसाय भारतासह विदेशात चालत असून त्यांच्या कंपनीकडून अनेक हिरे व्यापारी क्रेडिटवर हिरे घेतात. समीर चौकशी हा त्यांचा विश्वासू ब्रोकर असून गेल्या सात वर्षांपासून ते त्यांच्यासोबत हिर्‍यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात.

2018 साली त्यानेच अमेरिकेतील हिरे व्यापारी आशिष सोनी, चिंतन सोनी आणि जयवंत सोनी यांच्याशी त्यांची ओळख करुन दिली होती. या ओळखीदरम्यान त्यांनी सोनी कुटुंबियांचा अमेरिकेतील शिकागो शहरात हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून त्यांची जास डायमंड आयएनसी नावाची कंपनी असल्याचे सांगितले होते. अमेरिकेतील ठराविक टॉप हिरे व्यापार्‍यामध्ये या तिघांचा समावेश होतो. त्यांना त्यांच्यासोबत व्यवसाय करायचा असल्याने समीरने त्यांची शिफारस केली होती. समीरवर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना तीस लाखांचे हिर्‍यांची अमेरिकेत डिलीव्हरी केली होती. दोन दिवसांत हिर्‍यांचे पेमेंट करुन त्यांनीही त्यांचा विश्वास संपादन केला होता.

सप्टेंबर 2022 रोजी सोनी यांनी समीर यांना कॉल करुन त्यांच्याकडे चांगले हिरे ग्राहक असून त्यांना मोठ्या प्रमाणात हिर्‍यांची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे समीरने धनश्याम पटेल यांना ही माहिती सांगून त्यांना क्रेडिटवर साडेअठरा कोटीचे हिरे पाठविले होते. यावेळी त्यांच्यात एक एमओयू करण्यात आला होता. कराराप्रमाणे त्यांना 50 टक्के पेमेंट आधी बॅकेत जमा करण्यास सांगण्यात आले होते तर 120 दिवसांत पेमेंट किंवा विक्री न झालेले हिरे परत करण्याबाबत नमूद करण्यात होते. ठरल्याप्रमाणे सोनी यांनी 50 टक्के पेमेंट करुन काही दिवसांनी काही हिरे पाठविले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत 5 कोटी 36 लाखांचे पेमेंट केले नाही किंवा हिरे पाठविले नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली होती. यावेळी त्यांनी ग्राहकांकडून अद्याप पेमेंट मिळाले नसल्याचे सांगून त्यांच्याकडे आणखीन काही दिवसांची मुदत मागून घेतली होती. मात्र दिलेल्या मुदतीत पेमेंट केले नाही. अशा प्रकारे आशिष, जयवंत आणि चिंतन यांनी 5 कोटी 36 लाखांच्या हिर्‍यांचा अपहार करुन धनश्याम पटेल यांच्यासह त्यांच्या कंपनीची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने घनश्याम पटेल यांनी बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आशिष, जयवंत आणि चिंतन सोनी यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page