क्रेडिटवर घेतलेल्या पाच कोटीचा हिर्‍यांचा अपहार करुन फसवणुक

चार हिरे व्यापार्‍यांची फसवणुक करुन आरोपी व्यापार्‍याचे पलायन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 मे 2025
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे पाच कोटीचा हिर्‍यांचा अपहार करुन फसवणुक करुन चिराग हिम्मतलाल पटेल या हिरे व्यापार्‍याने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. चिरागने एकाच वेळेस चार हिरे व्यापार्‍याकडून हिरे घेऊन ही फसवणुक केली आहे. पळून गेलेल्या चिरागच्या अटकेसाठी बीकेसी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

आशिष हितेशभाई गोधानी हे हिरे व्यापारी असून विलेपार्ले येथे राहतात. त्यांचा वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये ब्रम्हा डायमंड नावाची एक कंपनी असून त्यांचा हिरे खरेदी-विक्रीमध्ये व्यवसाय आहे. त्यांच्या कंपनीत त्यांच्याच कुटुंबातील चार सदस्य पार्टनर म्हणून काम करतात. चिराग पटेल हे हिरे व्यापारी असून गेल्या सात वर्षांपासून ते एकमेकांच्या परिचित आहेत. त्याची आकृती इम्पेक्स नावाची एक कंपनी आहे. चिराग हा भारत डायमंड बोर्समधील हिरे दलालाकडून अनेकदा क्रेडिटवर हिरे घेत होता. त्याच्यासोबत त्यांचे अनेकदा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याने त्यांना त्याच्यावर विश्वास होता.

1 एप्रिल 2025 रोजी त्यांचा परिचित हिरे दलाल किशोर मोहनभाई पटेल हे त्यांच्या कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी चिराग पटेल यांच्यासाठी काही हिर्‍यांची मागणी केली होती. किशोर पटेलने चिरागसाठी अनेकदा त्यांच्याकडून हिरे घेतले होते, त्याचा व्यवहार पूर्ण केला होता. त्यामुळे त्यांनी किशोरच्या सांगण्यावरुन चिराग पटेलला 41 लाखांचे हिरे क्रेडिटवर दिले होते. सात दिवसांत व्यवहार पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन किशोर हा तेथून निघून गेला होता. त्यानंतर त्याच्याच सांगण्यावरुन 3 एप्रिल आणि 4 एप्रिलला त्यांनी पुन्हा चिराग पटेलला आणखीन काही हिरे दिले होते.

अशा प्रकारे एप्रिल महिन्यांत त्यांनी किशोरच्या सांगण्यावरुन चिराग पटेल 1 कोटी 32 लाख 19 हजार 350 रुपयांचे हिरे दिले होते. मात्र सात दिवस उलटूनही चिरागने त्याचा व्यवहार पूर्ण केला नव्हता. त्यामुळे त्यांच्यासह किशोर पटेलने त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी चिरागविषयी मार्केटमध्ये चौकशी सुरु केली होती.

या चौकशीदरम्यान चिरागने वॅबस डायमंड कंपनीचे मालक बदुकभाई मकोडभाई भिकडिया यांच्याकडून पराग महेशभाई शाह या दलालामार्फत 2 कोटी 33 लाख रुपयांचे 3061 कॅरेटचे हिरे, शक्ती जेम्स कंपनीचे मालक पराग महेश जी तावेथिया यांच्याकडून किशोर पटेल यांच्याकडून 75 लाख 58 हजार रुपयांचे 1094 कॅरेटचे पॉलिश हिरे आणि अक्षण इम्पेक्स कंपनीचे मालक विशाल चंद्रेशभाई गांधी यांच्याकडून 72 लाख रुपयांचे हिरे घेतल्याचे उघडकीस आले. मात्र त्यापैकी कोणालाही दिलेल्या मुदतीत पेमेंट केले नाही किंवा घेतलेले हिरे परत केले नव्हते.

अशा प्रकारे चिरागने आशिष गोधानी यांच्यासह इतर हिरे व्यापार्‍याकडून घेतलेल्या 7772 कॅरेटचे पाच कोटी चौदा लाखांच्या हिर्‍यांचा अपहार करुन फसवणुक करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच या चारही व्यापार्‍यांनी बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर चिराग पटेल याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. आतापर्यंतच्या चौकशीत चिरागने चार हिरे व्यापार्‍यांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले असले तरी त्याने अशाच प्रकारे इतर काही व्यापार्‍यांना गंडा घातला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page