सव्वाकोटीच्या हिर्यांचा अपहार करुन तीन व्यापार्यांची फसवणुक
श्रीजी कंपनीच्या मालकासह दोन कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 जुलै 2025
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे सव्वाकोटीचे हिरे घेऊन तीन हिरे व्यापार्यांची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीजी ज्वेलर्सचे मालक धवलकुमार धिरजलाल वडगामा व त्याचे दोन नानूभाई आणि महादेव गौडा यांच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
कौशिक नरसीभाई देसाई हे गिरगाव येथे राहत असून सृष्टी डियाम या कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतात. ही कंपनी हिर्यांची खरेदी-विक्री करत असून कंपनीचे मुख्य कार्यालय वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये आहे. या कंपनीत हरेशभाई डोबरिया आणि जगदीशभाई जिवानी हे पार्टनर आहेत. कंपनीने हिर्यांच्या विक्रीची सर्व जबाबदारी कौशिक देसाई यांना दिली आहे. 8 ऑगस्ट 2024 रोजी वांद्रे येथील बीकेसी, जिओ, जे. एस प्रिमिअरमध्ये हिर्यांचे एक प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यात श्रीजी ज्वेलर्सचे मालक नानूभाईशी त्यांची ओळख झाली होती. त्याने तो बंगलोर येथील ज्वेलर्स व्यापारी असून त्याला सोन्याचे दागिने बनविण्यासाठी काही हिर्यांची गरज असल्याचे सांगितले होते.
26 ऑक्टोंबर 2024 रोजी त्याने कौशिक देसाई यांना कॉल करुन त्यांच्याकडे हिर्यांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी नानूभाईच्या सांगण्यावरुन बंगलोरला 57 लाख 74 हजार रुपयांचे हिरे पाठविले होते. हिरे मिळाल्याची पोचपावती मिळताच नानूभाईच्या कंपनीने त्यांना दोन धनादेश पाठविले होते. मात्र ते दोघेही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. या धनादेशावरुन श्रीजी कंपनीचे मालक धवलकुमार वडगामा असून महादेव व नानूभाई हे दोघेही त्याच्याकडे कामाला असून नानूभाईकडे कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांनी तिन्ही आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता,
मात्र दोघांचे मोबाईल बंद होते. याच दरम्यान खोडल जेम्स कंपनीचे राजेशभाई काकडिया आणि निशिता एक्सपोर्ट कंपनीचे कुणाल वोरा यांच्याकडून संबंधित आरोपींनी अनुक्रमे 29 लाख आणि 38 लाख रुपयांचे हिरे क्रेडिटवर घेतल्याचे समजले होते. अशा प्रकारे कौशिक देसाईसह इतर दोन हिरे व्यापार्याकडून त्यांनी सव्वाकोटी रुपयांचे हिरे घेतले होते, मात्र दिलेल्या मुदतीत हिर्याचे पेमेंट केले नाही. त्यांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता आले होते.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच कौशिक देसाई यांनी राजेशभाई काकडिया आणि कुणाल व्होरा यांच्यासह त्यांच्या कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर श्रीजी ज्वेलर्सचे मालक धवलकुमार वडगामा व त्यांचे दोन कर्मचारी नानूभाई आणि महादेव गौडा यांच्याविरुद्ध हिर्यांचा अपहार करुन तीन हिरे व्यापार्यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी पळून गेले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.