रिपेरिंगसह पॉलिशसाठी दिलेल्या 58 लाखांचा हिर्‍यांचा अपहार

अपहारासह फसवणुकीप्रकरणी व्यापार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑगस्ट 2025
मुंबई, – रिपेरिंगसह पॉलिशसाठी दिलेल्या सुमारे 58 लाखांच्या हिर्‍यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्‍याची फसवणुक झाल्याचा प्रकार धनजी स्ट्रिट परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रमेश नरसीभाई वागासिया या व्यापार्‍याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. एक वर्ष उलटूनही दिलेले हिरे किंवा हिर्‍यांचे पेमेंट न करता रमेश वागासिया याने फसवणुक केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुकेश बाबूलाल सोनी हे हिरे व्यापारी असून त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवलीतील गोविंदनगर परिसरात राहतात. त्यांचा धनजी स्ट्रिट परिसरात पासमनी पल्स अ‍ॅण्ड ज्वेल्स एक्सपर्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाचे हिर्‍यांचे होलसेलमध्ये विक्री करण्याचा व्यवसाय आहे. रमेश वागासिया हा त्यांचा परिचित असून गेल्या तीस वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. त्याचा हिरे रिपेरिगसह पॉलिश करण्याचा व्यवसाय आहे. अनेकदा ते रमेश वागासियाला रिपेरिंगसह पॉलिश करण्यासाठी हिरे देत होते. तो त्यांना महिन्यांभरात हिरे पॉलिश आणि रिपेरिंग करुन देत होता.

सप्टेंबर-ऑक्टोंबर 2024 या कालावधीत त्यांनी त्याला सुमारे 58 लाख रुपयांचे 160 कॅरेटचे हिरे रिपेरिंगसह पॉलिश करण्यासाठी दिले होते. एक महिन्यांनी हिरे परत करतो असे सांगूनही त्याने तीन ते चार महिने उलटूनही हिरे परत केले नाही. विचारणा केल्यानंतर त्याने हिरे दुसर्‍या व्यापार्‍याला दिल्याचे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ठरल्याप्रमाणे त्याने त्यांना हिरे दिले नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे हिरे किंवा हिर्‍यांचे पेमेंट देण्याचे सांगितले होते. मात्र त्याने हिर्‍यांचे पेमेंट दिले नाही अथवा हिरे परत केले नव्हते. विविध कारण सांगून तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.

रमेश वागासिया याच्याकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार एल. टी मार्ग पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सुमारे 58 लाखांचा हिर्‍यांचा अपहार करुन मुकेश सोनी यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून रमेशची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीतून त्याने अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्‍यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page