दोन वेगवेगळ्या घटनेत 2.24 कोटीच्या हिर्‍यांचा अपहार

तिघांविरुद्ध स्वतंत्र अपहारासह फसणुकीच्या गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 जानेवारी 2026
मुंबई, – दोन वेगवेगळ्या घटनेत हिरे खरेदी-विक्री करणार्‍या दोन खाजगी कंपनीची 2 कोटी 40 लाख रुपयांच्या हिर्‍यांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे येथील बीकेसी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध बीकेसी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. धनराज पृथ्वीराज जैन, धवन बाबूभाई पटेल आणि ब्रोकर कौशिक गणेशभाई सुतारिया अशी या तिघांची नावे असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. यातील धवल दुबईत पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध पोलिसांकडून लवकरच लुक आऊट नोटीस बजाविली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जिग्नेश वल्लभभाई भायानी हे बोरिवलीतील रहिवाशी सध्या किरा डियाम कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये आहे. कंपनीचे राजेशभाई लखानी आणि शनय पारिख हे पार्टनर असून राजेशभाई कंपनीच्या सर्व कर्मचार्‍यांवर देखरेख ठेवतात. ऑगस्ट 2024 पासून त्यांच्याच कंपनीत धवल पटेल हा सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. तो कंपनीच्या वतीने विविध हिरे व्यापारी आणि ब्रोकर यांच्याशी हिरे खरेदी-विक्रीचे व्यवहार पाहत होता. ते सर्व व्यवहार राजेश यांच्या डिजीटल स्वाक्षरी होत असल्याने त्याच्यावर इतर कर्मचार्‍यांचा प्रचंड विश्वास होता.

या कंपनीची प्यूअर लॅब डायमंड आणि अमृत जेम्स नावाच्या ग्राहक कंपनी असून या कंपनीत कौशिक हा ब्रोकर म्हणून काम पाहत होता. त्यांच्याशी त्यांचा नियमित हिरे खरेदी-विक्रीचा व्यवहार चालत होता. सप्टेंबर ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत कंपनीने या दोन्ही ग्राहक कंपन्यांना 2 कोटी 95 लाख रुपयांचे 4959 कॅरेटचे हिरे दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत कंपनीने त्यांचे पेमेंट केले नव्हते. याच दरम्यान धवल हा कामावर येणे बंद झाला होता, चौकशीदरम्यान तो दुबईत निघून गेल्याचे समजले होते.

कौशिककडे कंपनीच्या वतीने विचारणा करण्यात आली होती. यावेळी त्याने धवलसोबत हिरे खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याचे मान्य केले, मात्र त्याने ते हिरे त्यांच्या कंपनीला न देता परस्पर दुसर्‍या हिरे व्यापार्‍यांना विक्री केल्याचे सांगितले. या दोघांनी संगनमत करुन त्यांच्या कंपनीकडून हिरे घेऊन संबंधित हिर्‍यांची परस्पर अपहार करुन कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच कंपनीच्या वतीने जिग्नेश भायानी यांनी बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती.

ही घटना ताजी असतानाच अशाच प्रकारे अन्य एका हिरे व्यापार्‍याची सुमारे 45 लाखांच्या हिर्‍यांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आली आहे. योगेश धीरजलाल कामदार हे जोधानी ब्रदर्स कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतात. या कंपनीत जयसुखभाई जोधानी, विनोदभाई जोधाणी, हरेश जोधानी, धिरुभाई जोधानी आणि भरतभाई जोधानी हे पार्टनर आहेत. कंपनीने योगेश कामदार यांना हिरे खरेदी-विक्रीची जबाबदारी सोपविली होती. धनराज जैन हा भाविका डायमंड कंपनीचा मालक असून तो त्यांच्या परिचित आहेत. त्याच्यासोबत त्यांचा अनेकदा व्यवहार झाल्याने त्याच्यावर त्यांचा विश्वास होता.

नोव्हेंबर 2025 रोजी त्याने त्यांच्याकडून 65 कॅरेटचे सुमारे 45 लाखांचे हिरे क्रेडिटवर घेतले होते. मात्र या हिर्‍यांचे पेमेंट न करता त्याने त्यांच्या कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीच्या वतीने योगेश कामदार यांनी धनराज जैनविरुद्ध तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीनंतर पोलिसांनी धनराज जैन, धवल पटेल आणि कौशिक सुतरिया यांच्याविरुद्ध दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. या गुन्ह्यांतील तिन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page