क्रेडिटवर दिलेल्या साडेअठरा लाखांचा हिर्यांचा अपहार
मिरारोडच्या हिरे व्यापार्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 जानेवारी 2026
मुंबई, – क्रेडिटवर दिलेल्या सुमारे साडेअठरा लाखांच्या हिर्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे येथील बीकेसी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिगांत द्विवेदी या मिरारोडच्या हिरे व्यापार्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. दिगांतने अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्यांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्याचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.
चंद्रप्रकाश गणपतराव अग्रवाल हे वरळी येथे राहत असून हिरे व्यापारी आहेत. त्यांची वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये रिओ डिअम नावाची एक कंपनी आहे. याच कंपनीतून विविध हिरे व्यापार्यांना क्रेडिटवर विक्रीसाठी हिर्यांची खरेदी-विक्री केली जाते. विरेंद्र बांटीया हे त्यांच्या परिचित असून गेल्या दहा वर्षांपासून ते एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा अनेकदा हिर्यांचा व्यवहार झाल्याने त्यांच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता.
त्यांनी त्यांची दिगांत द्विवेदीशी ओळख करुन दिली होती. तो मिरारोड येथे राहत असून हिरे व्यापारी म्हणून काम करत होता. त्याने विरेंद्रसोबत अनेकदा व्यवहार केला होता, त्यामुळे त्यांनी त्याची चंद्रप्रकाशकडे शिफारस केली होती. त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी दिगांतसोबत व्यवहार सुरु केला होता. मार्च 2025 रोजी तो त्यांच्या कार्यालयात आला होता. त्याच्याकडे चांगले हिरे खरेदी करणारे ग्राहक असल्याचे त्याने त्यांच्याकडून 51 कॅरेटचे साडेअठरा लाखांचे लुज, कट आणि पॉलिश केलेले नैसगिंक हिरे क्रेडिटवर घेतले होते.
त्यांना धनादेश देऊन तो हिरे घेऊन गेला. मात्र पंधरा दिवसांत त्याने त्यांना हिर्यांचे पेमेंट केले नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर तो त्यांच्याकडे आणखीन मुदत मागत होता. काही दिवसांनी त्यांनी त्याने दिलेला धनादेश बँकेत टाकला होता. हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. त्याचे बँक खाते बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बंद असलेल्या खात्याचा धनादेश देऊन, हिर्यांचे पेमेंट न करता दिगांतने त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी बीकेसी पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दिगांत द्विवेदीविरुद्ध पोलिसांनी हिर्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.