१.३० कोटीच्या हिर्यांचा अपहार करुन व्यापार्याची फसवणुक
वांद्रे येथील घटना; दलालाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ जून २०२४
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या एक कोटी तीस लाख रुपयांच्या हिर्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुणाल भरत मेहता या हिरे दलालाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. कुणालने इतर काही हिरे व्यापार्याकडूनही हिरे घेऊन त्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
विलेपार्ले येथे राहणारे शैलेश त्रिकमभाई कलाथिया हे हिरे व्यापारी असून त्यांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये श्रेया जेम्स नावाची एक कंपनी आहे. कुणाल हा हिरे विक्री करणारा दलाल असून तो भाईंदरच्या देवचंदनगरात राहतो. गेल्या पाच महिन्यांपासून ते कुणालला ओळखत होते. त्याचा इतर हिरे व्यापार्यासोबत व्यवहार सुरु होता. याच व्यापार्यांनी त्यांची कुणालसोबत ओळख करुन दिली होती. त्यांनी त्याला यापूर्वी हिरे विक्रीसाठी दिले होते. त्याचे पेमेंट त्याने वेळेवर केल्यानंतर त्याच्यावर त्यांचा विश्वास होता. २१ मेला तो त्यांच्या कार्यालयात आला होता. त्याच्याकडे हिरे खरेदी करणारी एक पार्टी असून त्यांना कोट्यवधी रुपयांच्या हिर्यांची तातडीने गरज आहे. या व्यवहारात त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्याला १ कोटी ३० लाख रुपयांचे हिरे दिले होते. हिरे दिल्यानंतर कुणाल हा दोन दिवस त्यांच्या नियमित संपर्कात होता. मात्र नंतर त्याने संपर्क साधणे बंद केले होते. काम सुरु असून लवकरच हिर्यांची विक्री होईल.
२४ मेपर्यंत हिरे किंवा पेमेंट कार्यालयात जमा करतो असेही त्याने सांगितले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने पेमेंट केले नाही. कॉल केल्यानंतर त्याचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या एका कर्मचार्याला त्याच्या राहत्या घरी पाठविले होते, मात्र कुणाल हा घरातून पळून गेला होता. त्याच्याबाबत कोणाला काहीही माहिती नव्हती. त्यांनी काही व्यापार्यांशी संपर्क साधला असता कुणालने त्यांच्याकडून काही हिरे घेतले होते, मात्र दिलेल्या मुदतीत पेमेंट न करता तो पळून गेला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कुणालविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हिर्यांचा अपहार करुन हिरे व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंतच्या चौकशीत कुणालने शैलेश कलाथिया यांच्यासह इतर काही हिरे व्यापार्याकडून कोट्यवधी रुपयांचे हिरे घेतले आहे. या हिर्यांचा अपहार करुन तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.