६७ लाखांच्या हिर्यांचा अपहार करुन व्यापार्याची फसवणुक
आरोपी व्यापार्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ जुलै २०२४
मुंबई, – विक्रीसाठी घेतलेल्या सुमारे ६७ लाखांच्या हिर्यासह हिरेजडीत दागिन्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची त्याच्याच परिचित व्यापार्याने फसवणुक केली. याप्रकरणी श्रेयांश मदनलाल गोलेचा या व्यापार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
लोकेश अशोक चोपडा हे हिरे व्यापारी असून ते अंधेरीतील रुणवाल एलिगंट अपार्टमेंटमध्ये त्यांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून धनजी स्ट्रिट, पॉप्युलर मार्केटमध्ये त्यांचे हर्ष ज्वेल नावाचे एक दुकान आहे. श्रेयांश हा त्यांच्या परिचित व्यापारी असून तो बोरिवलीतील नेन्सी कॉलनीत राहतो. जानेवारी ते फेब्रुवारी २०२० रोजी त्याने त्यांच्याकडून विक्रीसाठी ७२ लाख रुपयांचे काही हिरे आणि हिरेजडीत दागिने घेतले होते. त्यापैकी त्याने त्यांना सव्वापाच लाखांचे पेमेंट केले होते. मात्र वारंवार विचारणा करुनही तो त्यांना उर्वरित ६६ लाख ८५ हजाराचे पेमेंट देत नव्हता. चौकशीदरम्यान त्यांना श्रेयांश गोलेचा याने त्यांच्याकडून घेतलेल्या हिर्यांसह हिर्यांच्या दागिन्यांची परस्पर इतर व्यापार्यांना विक्री करुन या व्यापार्याकडून मिळालेल्या पैशांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच लोकेश चोपडा यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर श्रेयांशविरुद्ध पोलिसांनी ४०९, ४२० भादवी कलमातर्ंगत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत लवकर त्याची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.