मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे ५१ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी हिरे दलाल राकेश बाबूलाल वोहेरा याच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच त्याने नऊ लाखांचे पेमेंट केले, मात्र उर्वरित पैशांचा अपहार करुन तो पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
संयम विनोद शहा हे हिरे व्यापारी असून मलबार हिल परिसरात राहतात. त्यांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून त्यांची धनेरा डायमंड नावाची एक कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्स परिसरात आहे. कांदेवाडीचा हिरे दलालीचे काम करणारा राकेश वोहेरा हा त्यांचा परिचित असून गेल्या सहा वर्षांपासून ते त्याला ओळखतात. त्यांच्या वडिलासोंबत राकेशने काम केले होते. त्यांच्याकडून त्यांची त्याच्याशी ओळख झाली होती. त्याच्यासोबत त्यांनी अनेकदा हिर्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. व्यवहारात चोख असल्याने त्याच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. २९ ऑगस्टला ते त्यांच्या कार्यालयात बसले होते. यावेळी त्यांना राकेशचा फोन आला. त्याच्याकडे काही हिरे व्यापारी आले असून त्यांना हिर्यांची आवश्यकता आहेत. त्यामुळे त्यांनी त्याला ऑपेरा हाऊस येथे काही हिरे पाठविण्याची विनंती केली होती. त्यानंतर संयम शहा यांनी त्यांच्या कर्मचार्याला ६० लाख ७७ हजार रुपयांचे १७५ कॅरेटचे नॅचरल कट ऍण्ड पॉलिश हिरे घेऊन तिथे पाठविले होते. काही दिवसांत हिरे किंवा हिर्यांच्या विक्रीतून आलेले पेमेंट जमा करण्याचे त्याने त्यांना आश्वासन दिले होते.
मात्र दोन महिने उलटूनही त्याने हिरे किंवा पेमेंट केले नाही. विचारणा केल्यानंतर त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. मोबाईलवर संपर्क साधल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. क्रेडिटवर दिलेल्या हिर्यांचा राकेशने अपहार करुन फसवणुक केल्याचे लक्षात येताच त्यांनी बीकेसी पोलिसांत राकेशविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी राकेश वोहेराविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची माहिती मिळताच त्याने त्यांच्या बँक खात्यात नऊ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र उर्वरित ५१ लाख ७७ हजाराचा अपहार करुन पलायन केले होते. त्यामुळे पळून गेलेल्या राकेशच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्याकडून क्रेडिटवर हिरे घेतले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.