क्रेडिटवर घेतलेल्या १.९२ कोटींच्या हिर्‍यांचा अपहार

हिरे व्यावसायिक पिता-पूत्राविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ डिसेंबर २०२४
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या १ कोटी ९२ लाख रुपयांच्या हिर्‍यांचा अपहार करुन एका हिरे व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे येथील बीकेसी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिरे व्यावसायिक असलेल्या पिता-पूत्राविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. किशोर नरसीभाई अभांगी आणि मौलिक किशोर अभांगी अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ताडदेवचे रहिवाशी असलेले प्रियांक महेंद्रकुमार शाह हे हिरे व्यावसायिक असून त्यांच्या मालकीची के. आरीन ज्वेल्स नावाची एक कंपनी आहे. त्यांचा भाऊ सुदीप शाह हादेखील हिरे व्यावसायिक असून त्याची आर्यन इम्पेक्स नावाची एक कंपनी आहे. या दोघांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून त्यांच्या कंपनीचे कार्यालय वांद्रे येथील बीकेसी भारत डायमंड बोर्स परिसरात आहे. याच ठिकाणी किशोर लिंबासिया हे हिरे दलाल म्हणून काम करत असून गेल्या पाच वर्षांपासून ते एकमेकांच्या परिचित आहेत. सप्टेंबर २०२४ रोजी त्यांनीच त्यांची ओळख हिरे व्यावसायिक असलेले किशोर अभांगी याच्यासोबत करुन दिली होती. त्याची पार्थ डायमंड नावाची एक कंपनी आहे. त्याचे बीकेसीसह गुजरात येथील सुरत शहरात मुख्य कार्यालय आहे. ते दोघेही एकाच व्यवसायाशी संबंधित असल्याने त्यांची काही दिवसांत चांगली मैत्री झाली होती.

१८ सप्टेंबर २०२४ रोजी किशोर लिंबासिया हे किशोर अभांगी आणि मौलिक अभांगी याच्यासोबत त्यांच्या कार्यालयात आले होते. यावेळी या दोघांनी त्यांना त्यांच्याकडे हिरे खरेदी करणारी एक चांगली ग्राहक कंपनी आहे. त्यांना चांगल्या प्रतीच्या हिर्‍यांची गरज आहे. त्यामुळे किशोर लिंबासिया यांनी त्यांच्या गॅरंटीवर या दोघांनाही क्रेडिटवर हिरे देण्याची विनंती केली होती. त्यांच्यासोत प्रियांक शाह यांनी अनेकदा हिर्‍यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. त्यामुळे त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी पार्थ कंपनीचे दोन्ही संचालक व्यावसायिक किशोर अभांगी आणि मौलिक अभांगी यांना १ कोटी ९३ लाख रुपयांचे ४५९ कॅरेटचे हिरे क्रेडिटवर दिले होते.

दोन ते चार दिवसांत व्यवहाराची माहिती देतो असे सांगून ते दोघेही निघून गेले होते. एक आठवड्यानंतर त्यांनी या दोघांनाही कॉल केला असता त्यांनी ग्राहकाला हिरे दाखविले असून त्यांच्यात लवकरच व्यवहार पूर्ण होणार असल्याचे सांगितले. मात्र एक महिना उलटूनही त्यांनी त्यांना त्यांच्यातील व्यवहाराची माहिती सांगितली नव्हत. त्यामुळे ते त्यांच्या बीकेसी येथील कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांचे कार्यालय बंद होते. त्यांनी किशोर लिंबासिया यांच्याकडे चौकशी केली असता ते दोघेही काही दिवसांपासून त्यांच्या कार्यालयात येत नसल्याचे समजले. मोबाईल बंद असल्याने त्यांचा संपर्क होत नव्हता. ते दोघेही हिरे घेऊन पळून गेले होते.

ग्राहकांना हिरे दाखविण्यासाठी घेतलेल्या १ कोटी ९२ लाख रुपयांच्या हिर्‍यांचा अपहार करुन या पिता-पूत्रांनी त्यांची फसवणुक केल्याचे लक्षात येताच त्यांनी बीकेसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी पिता-पूत्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर किशोर अभांगी आणि मौलिक अभांगी या दोघांविरुद्ध पोलिसांनी हिर्‍यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page