मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मार्च 2025
मुंबई, – पायधुनीतील एका व्यावसायिकाची एक कोटी अकरा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिरे व्यवसायातील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेसह तिघांनी तक्रारदार व्यावसायिकाला गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सैफ अन्वर शेख, नोमान अन्वर शेख आणि बिल्कीस अन्वर शेख अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे.
मोहम्मद तैयब ताई हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत पायधुनीत परिसरात राहतात. जून 2023 रोजी त्यांची सैफ, नोमान आणि बिल्कीस यांच्याशी ओळख झाली होती. या तिघांनी त्यांच्याकडे हिर्यांचा व्यवसाय सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हिरे व्यापार्याकडून स्वस्तात हिरे खरेदी करुन त्याची इतर ग्राहकांना विक्री करुन त्यातून चांगला नफा मिळविण्याची योजना सांगितली होती. या व्यवसायात गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला परवाता देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्या या आमिषाला बळी पडून त्यांनी त्यांना हिरे खरेदीसाठी एक कोटी अकरा लाख रुपये दिले होते.
याच पैशांतून त्यांनी 13 जानेवारी आणि 14 जानेवारी 2025 रोजी चौदा हजाराच्या प्रती कॅरेटने एक कोटी अकरा लाखांचे 795 कॅरेटचे हिरे खरेदी केले होते. ते हिरे ग्राहकांना विक्री करुन तीन ते चार दिवसांत पेमेंट करतो. हिर्यांची विक्री झाली नाहीतर हिरे परत करुन त्यांना त्यांचे पेमेंट करतो असे सांगितले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी हिर्यांची विक्री केली नाही किंवा त्यांना पेमेंट केले नाही. विचारणा केल्यानंतर ते तिघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते.
या तिघांकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पायधुनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी सैफ शेख, नोमान शेख आणि बिल्कीस शेख या तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.