२० लाखांच्या हिर्यांच्या अपहारप्रकरणी व्यापार्याला अटक
दहिसर पोलिसांची कामगिरी, पाच महिन्यांपासून फरार होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – विक्रीसाठी दिलेल्या सुमारे वीस लाखांचा अपहार करुन फसवणुक कटातील एका वॉण्टेड कापड व्यापार्याला अटक करण्यात दहिसर पोलिसांना यश आले आहे. विजय हरिभाई देसाई असे या आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल होताच गेल्या पाच महिन्यांपासून विजय हा फरार होता. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अटक झालेला विजय देसाई हा तिसरा आरोपी असून यापूर्वी याच गुन्ह्यांत मीत दिपककुमार शाह आणि दिपककुमार नगीनदास शाह या पिता-पूत्राला पोलिसांनी अटक केली होती तर फेनील सुरेश दोशी याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
भूपतभाई कानूभाई राजानी हे हिरे व्यापारी असून ते दहिसर येथे राहतात. गेल्या २३ वर्षांपासून ते हिर्यांची खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. दहिसर येथे त्यांची स्वतची एक कंपनीसह कारखाना आहे. याच कारखान्यात हिर्यावर प्रक्रिया करुन नंतर त्याची विक्री केली जाते. गेल्या वर्षी मे महिन्यांत त्यांची मीत शहाशी ओळख झाली होती. तो हिर्यांची दलालीचे काम करत होता. त्याच्या परिचित अनेक हिरे व्यापारी असून त्यांच्या हिर्यांचा चांगली किंमत मिळवून देतो असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२३ रोजी त्याने त्यांच्याकडून साहिल चौक्सी या व्यापार्याला विक्रीसाठी २० लाख ५० हजार रुपयांचे हिरे घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हिर्यांचे पेमेंट केले नाही किंवा हिरे परत केले नव्हते. विचारणा केल्यानंतर तो बंगलोरला असून एक महिन्यानंतर मुंबईत येणार असल्याचे सांगत होता. मात्र एक महिना उलटूनही त्याने पेमेंट केले नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे हिर्यांची मागणी सुरु केली होती. सततच्या मागणीनंतर मीतने त्याचा मोबाईल बंद केला होता. त्याच्या वाळकेश्वर येथील घरी गेल्यानंतर त्यांना मीत हा जानेवारी २०२४ पासून घरी आला नव्हता. तो कुठे आहे याची त्याच्या वडिलांसह पत्नीला काहीच माहिती नव्हती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी जून महिन्यांत मीतसह अन्य एका व्यापार्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ओम ज्वेलर्सचे मालक साहिल आणि मीत शहा या दोघांविरुद्ध दहिसर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच मीत शहाला १२ जुलैला तर त्याचे वडिल दिपककुमार शहा याला १० सप्टेंबरला दहिसर पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत या दोघांविरुद्ध नंतर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या आरोपपत्रात साहिल ऊर्फ विजय देसाई आणि फेनील सुरेश दोशी या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. त्यांचा शोध सुरु असताना विजय हा त्याच्या कांदिवलीतील डहाणूकरवाडी, क्रिस्टल अपार्टमेंटमधील राहत्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर सोमवारी पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून विजयला अटक केली. विजय हा कापड व्यापारी असून त्याच्याविरुद्ध बीकेसी आणि गुजरातमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल होताच तो गेल्या पाच महिन्यांपासून फरार होता, अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. फेनील दोशी हा अद्याप फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.