८९ लाखांच्या हिर्यांचा अपहारप्रकरणी ब्रोकरविरुद्ध गुन्हा
अनेक हिरे व्यापार्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० जून २०२४
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे ८९ लाखांच्या हिर्यांचा अपहार करुन एका हिरे कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी मित दिपक शाह या ब्रोकरविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मित शहाने बीकेसीतील भारत डायमंड बोर्समधील अनेक व्यापार्याकडून हिरे घेऊन त्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
दिपक गणेशभाई मोरडिया हे मूळचे गुजरातच्या सुरतचे रहिवाशी आहेत. त्यांची वर्णीराज इंटरप्रायजेस नावाची हिरे खरेदी-विक्री करणारी एक कंपनी असून या कंपनीत ते संचालक म्हणून काम करतात. या कंपनीचे वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये एक कार्यालय असून तिथेच हार्दिक भलानी आणि केतन मोरडिया सेल्स अधिकारी म्हणून काम करतात. निशीत किरीटभाई शाह हा ब्रोकर असून त्याचे त्यांच्या सुरत कंपनीसोबत गेल्या दहा वर्षांपासून हिरे खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु होता. निशीत हा त्यांचा अत्यंत विश्वासातील ब्रोकर म्हणून परिचित होता. त्यामुळे अनेकदा त्याला कंपनीने लाखो रुपयांचे हिरे क्रेडिटवर दिले होते. त्याने दिलेल्या मुदतीत हिरे किंवा हिर्यांच्या विक्रीतून आलेले पेमेंट कंपनीत जमा केले होते. २४ जानेवारी निशीत हा त्याचा चुलत भाऊ मीत शाहसोबत त्यांच्या वांद्रे येथील कंपनीत आला होता. यावेळी निशीतने मीत हादेखील ब्रोकर असून त्याच्याकडे चांगले हिरे ग्राहक असल्याचे सांगितले होते. मीतने त्याच्याकडे हिरे खरेदीसाठी काही व्यापारी आले असून त्याला हिर्यांची गरज असल्याचे सांगितले. त्याची शिफारस निशीतने केल्यामुळे कंपनीने त्याला ८९ लाख ६१ हजाराचे हिरे क्रेडिटवर दिले होते. आठवड्याभरात पेमेंट करण्याचे आश्वासन देऊन मीत हा कार्यालयातून निघून गेला. मात्र एक आठवडा उलटूनही त्याने पेमेंट केले नाही अथवा हिरे परत केले नव्हते. याबाबत विचारणा केल्यानंतर तो त्यांना अद्याप व्यवहार झाला नसून व्यवहार झाल्यानंतर पेमेंट जमा करतो असे सांगत होता. काही दिवसांनी त्याला पुन्हा कॉल केल्यानंतर त्याचा मोबाईल बंद असल्याचे दिसून आले.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी मीतबाबत मार्केटमध्ये चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान मीतने त्यांच्यासह इतर हिरे व्यापार्याकडून क्रेडिटवर लाखो रुपयांचे हिरे घेतले होते, मात्र कोणालाही पेमेंट न करता किंवा हिरे परत न करता तो पळून गेला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या वतीने दिपक मोरडिया यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मीत शाहविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्याच्या अटकेनंतर त्याने अशाच प्रकारे आणखीन किती हिरे व्यापार्यांची फसवणुक केली आहे याचा उलघडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.