वयोवृद्ध महिलेला गंडा घालणार्या तोतया पोलीस-वकिलाला अटक
डिजीटल अटकेची भीती दाखवून पावणेदहा लाखांचा अपहार केला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 मार्च 2025
मुंबई, – कांदिवलीत परिसरात राहणार्या एका वयोवृद्ध महिलेला गंडा घालणार्या दोन वॉण्टेड तोतया पोलीस आणि वकिलांना चारकोप पोलिसांनी अटक केली. या दोघांनी पोलीस आणि वकिल असल्याची बतावणी करुन या महिलेला डिजीटल अटकेची भीती दाखवून तिच्याकडून पावणेदहा लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. भगतराम भंवरलाल देवाशी आणि कमलेश मगाभाई चौधरी अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
प्रविणा जगदीश झव्हेरी ही 71 वर्षांच्या वयोवृद्ध महिला कांदिवलीतील मिलेनियम टाऊनशीपमध्ये तिच्या कुटुंबियांसोबत राहते. 15 जानेवारीला ती तिच्या घरी होती. यावेळी तिला एका अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला होता. तिच्या बँक खात्यात लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. त्यामुळे तिचे बँक खाते लवकरच बंद होणार आहे. तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यांत तिची चौकशी होणार आहे. चौकशीदरम्यान तिचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्यानंतर तिला या गुन्ह्यांत अटक करण्याची धमकी दिली होती. तोपर्यंत तिला तिच्या राहत्या घरी डिजीटल अटक केल्याची बतावणी करुन तिची चौकशी सुरु करण्यात आली होती.
याच दरम्यान तिला अन्य एका व्यक्तीने फोन करुन चौकशीला सहकार्य करण्यास सांगितले होते. या दोघांनी तिला पोलीस आणि वकिल असल्याची बतावणी केली होती. चौकशीदरम्यान त्यांनी तिला या गुन्ह्यांत सहकार्य करण्याचे आश्वासन देताना तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी तिला काही बँक खात्यात माहिती दिली होती. याच बँकेत खात्यात तिला ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. चौकशीनंतर ही रक्कम तिच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर केली जाईल असे सांगितले होते.
अटकेच्या भीतीने तिने दिलेल्या बँक खात्यात पावणेदहा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र त्यांनी तिचे पैसे परत केले नाही किंवा तिची नंतर चौकशीही केली नव्हती. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने तिच्या कुटुंबियासह नातेवाईकांनी ही माहिती सांगितली होती. तिची फसवणुक झाल्याचे सांगून त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने मुंबई पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटवरुन तक्रार केली होती. या तक्रारीची माहिती नंतर चारकोप पोलिसांना देण्यात आली होती. तिची जबानी नोंदवून चारकोप पोलिसांनी दोन्ही सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना दोन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या भगतराम देवाशी आणि कमलेश चौधरी या दोघांनाही पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.