डिजीटल अरेस्टची भीती दाखवून 2.89 कोटीची फसवणुक

तक्रार प्राप्त होताच 1.29 कोटीची रक्कम वाचविण्यात यश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 जून 2025
मुंबई, – ट्राय अधिकार्‍यासह पोलीस आणि न्यायाधिश असल्याची बतावणी करुन डिजीटल अरेस्टची भीती दाखवून एका 73 वर्षांच्या वयोवृद्ध डॉक्टरची अज्ञात सायबर ठगांनी 2 कोटी 89 लाखांची फसवणुक केली. फसवणुकीची तक्रार प्राप्त होताच सायबर सेल पोलिसांला 1 कोटी 29 लाखांची रक्कम वाचविण्यात यश आले आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. उर्वरित रक्कम ज्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली, त्या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील तक्रारदार 73 वर्षांचे वयोवृद्ध असून व्यवसायाने डॉक्टर आहेत. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले परिसरात राहतात. 2 जूनला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो ट्रायचा अधिकारी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांना अन्य काही व्यक्तींनी ते पोलीस आणि न्यायाधिश असल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्यात अनियमित व्यवहार झाल्याचे सांगितले.

मनी लॉड्रिंग गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या बँक खात्यात नरेश गोयल याच्या गुन्ह्यांतील काही रक्कम ट्रान्स्फर झाल्याचा गंभीर आरोप केला होता. याच गुन्ह्यांत त्यांच्यावर कारवाई होणार असून त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी त्याच्या बँक खात्यासह प्रॉपटीविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी त्यांचा नरेश गोयलशी काहीही संबंध नसून त्यांच्या बँक खात्यात मनी लॉड्रिंगची रक्कम ट्रान्स्फर झाली नसल्याचे सांगतले.

मात्र त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने डिजीटल अरेस्टची धमकी देऊन त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आहे. या दरम्यान त्यांना कोणाशी संपर्क साधता येणार नाही, कोणाचे कॉल घेता येणार नाही. त्यांना घराबाहेर जाता येणार नाही असे सांगून त्यांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर तात्काळ अटकेची कारवाई केली जाईल असे सांगितले. त्यामुळे ते प्रचंड घाबरले होते. त्यांनी त्यांच्या बँक खात्याची डिटेल्स त्यांना पाठवून दिली होती. त्यानंतर त्यांना बँक खात्यातील रक्कम ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते.

चौकशीनंतर ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर केली जाईल असे सांगितले. त्यांना 2 जून ते 4 जून दरम्यान पाच ऑनलाईन व्यवहाराद्वारे 2 कोटी 89 लाख रुपये विविध बॅक खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर त्यांनी त्यांना संपर्क साधला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या परिचिताकडे चौकशी केली होती. यावेळी त्यांना त्यांची फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती.या तक्रारीची सायबर सेल पोलिसांनी गंभीर दखल घेत तपास सुरु केला होता.

पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, निवृत्ती बावस्कर, पोलीस हवालदार अभिजीत राऊळ, पोलीस शिपाई किरण पाटील, महिला पोलीस शिपाई सोनाली काकड यांनी तात्काळ एनसीआरपी पोर्टलवर तक्रार करुन संबंधित बँकेच्या नोडल अधिकार्‍यांशी संपर्क साधला होता. त्यांना घडलेला प्रकार संबंधित बँक खात्यातील व्यवहार थांबविण्याची विनंती केली होती. त्यानंतर या अधिकार्‍यांनी काही बँक खात्यातील व्यवहार थांबवून 1 कोटी 29 लाख रुपये फ्रिज केले होते. तक्रार प्राप्त होताच ही रक्कम वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे या पोलीस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page