डिजीटल अरेस्टची धमकी देऊन वयोवृद्धाकडून खंडणी वसुली
दहा लाखांची खंडणी घेणार्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2025
मुंबई, – डिजीटल अरेस्टची धमकी देऊन एका 70 वर्षांच्या वयोवृद्ध व्यावसायिकाकडून दोन अज्ञात व्यक्तींनी दहा लाखांची खंडणी वसुली केल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी गोपेशकुमार आणि राजवीरकुमार नावाच्या दोन व्यक्तीविरुद्ध कांदिवली पोलिसांनी तोतयागिरी करुन खंडणीसाठी धमकी देणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली क्राईम ब्रॅचचे अधिकारी असल्याची बतावणी करुन या दोघांनी खंडणीची मागणी केली होती. त्यांच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड काढण्यात आले असून या रेकॉर्डवरुन दोन्ही आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नरेश गोरधनदास परमार हे वयोवृद्ध तक्रारदार कांदिवलीतील मथुरादास रोड, गोविंदभवन कंपाऊंड परिसरात राहत असून ते व्यावसायिक आहेत. 16 जानेवारीला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात मोबाईलवरुन गोपेशकुमार नावाच्या एका व्यक्तीने कॉल केला होता. त्याने तो दिल्ली क्राईम ब्रॅचमधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या आधारकार्डद्वारे एका नामांकित बँकेत खाते उघडण्यात आले होते. या बँक खात्यात मनी लॉड्रिंगचे वीस लाख रुपये जमा झाले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल असून याच गुन्ह्यांत त्यांची चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असेपर्यंत त्यांना त्यांच्या राहत्या घरी डिजीटल अरेस्ट करण्यात आले होते. या दरम्यान त्यांना कोणाशी संपर्क साधता येणार नाही किंवा त्यांनीदेखील कोणालाही संपर्क साधू नये असे सांगितले होते. त्यांनी कायद्याचे उल्लघंन केल्यास त्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली जाईल अशी धमकी दिली होती.
ही माहिती ऐकून नरेश परमार यांना धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी ही माहिती कोणालाही शेअर केली नव्हती. दुसर्या दिवशी त्यांना अन्य एका व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला होता. या व्यक्तीने तो पोलीस उपायुक्त राजवीरकुमार असल्याचे सांगून त्यांची चौकशी सुरु असून त्यांची डिजीटल अरेस्टची कारवाई अशीच सुरु राहणार आहे असे सांगितले. या व्यक्तीने त्यांच्या वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना अटकेची भीती दाखवून त्यांच्याकडून दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यासाठी त्याने त्यांना एका बँक खात्याचा तपशील पाठविला होता. चौकशी पूर्ण होताच त्यांना त्यांची सर्व रक्कम परत केली जाईल असे सांगितले.
भीतीपोटी त्यांनी संबंधित बँक खात्यात दहा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर त्यांना कोणीही कॉल केला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या परिचितांना ही माहिती सांगितली. यावेळी त्यांनी त्यांना डिजीटल अरेस्ट अशी कोणतीही कारवाई पोलिसांकडून केली जात नसून त्यांची अज्ञात सायबर ठगाकडून फसवणुक झाली आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार करावी असा सल्ला दिला होता. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कांदिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दिल्लीतील संबंधित तोतया पोलिसांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोन्ही आरोपीविरुद्ध भारतीय न्यास सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.