विविध गुन्ह्यांत अटकेची भीती दाखविणार्‍या त्रिकुटास अटक

डिजीटल अरेस्टच्या नावाने 67 लाख उकाळल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
30 जून 2025
मुंबई, – ड्रग्जसहीत मनी लॉड्रिंग, मानव तस्करी आणि अवैध धंद्यासाठी बँक खाते उपलब्ध करुन लाखो रुपयांचा घोटाळा केल्याच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून एका निवृत्त एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकार्‍याला गंडा घालणार्‍या त्रिकुटाला पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. वेदांत नानकीदास महंत, मोहित हरेशभाई भुतैया आणि भाविक जशभाई पटेल अशी या तिघांची नावे आहेत. तिन्ही आरोपी गुजरातच्या बडोदाचे रहिवाश आहे. डिजीटल अरेस्टच्या नावाने या टोळीने आतापर्यंत तक्रारदाराकडून 67 लाख रुपये उकाळल्याचा आरोप आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

59 वर्षांचे तक्रारदार मालाड येथे राहत असून एअर इंडियामधून निवृत्त झाले आहेत. 10 डिसेंबर 2024 रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो दिल्लीच्या ट्राय विभागातून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या नावाने एक सिमकार्ड घेण्यात आले आहे. या सिमकार्डवरुन अनेक लोकांना मॅसेज करुन त्रास दिला जात आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल झाला आहे. तुम्ही दिल्लीला कधी आणि केव्हा आला होता याबाबत त्यांची चौकशी करण्यात आली होती. यावेळी त्यांनी आपण दिल्लीला आलो नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने कॉल बंद केला होता.

काही वेळानंतर त्यांना पुन्हा एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला. त्याने त्याचे सुरजकुमार असून तो सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन विविध बँकेत खाते उघडण्यात आले आहे. त्यात ड्रग्ज, मनी लॉड्रिंग, मानव तस्करीसह अवैध धंद्याचे लाखो रुपये जमा झाले आहे असे सांगून त्यांची फोनवरुनच चौकशी सुरु केली होती. त्यांच्या प्रॉपटीसह बँक खात्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचा मोबाईल सीबीआयच्या निगराणीखाली असून त्यांना या गुन्ह्यांत कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत त्यांना त्यांच्या राहत्या घरी डिजीटल अरेस्ट करण्यात आल्याचे सांगितले. त्याने त्यांना भारतीय राजमुद्रा असलेले काही दस्तावेज पाठविले, ते दस्तावेज खरे समजून त्यांनी त्यांना तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.

यावेळी सुरजकुमारने तपास पूर्ण होईपर्यंत हा प्रकार कोणालाही सांगू नका, याबाबत चर्चा करु नका असे सांगून त्यांना त्यांच्याकडील बँकेशी संबंधित पासबुकसह इतर दस्तावेज व्हिडीओ कॅमेर्‍यासमोर दाखविण्यास प्रवृत्त केले. दुसर्‍या दिवशी त्यांना त्यांच्या बँकेचे एफडीसह म्युच्युअल फंडाची मोडून पैसे काढण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले दुसर्‍या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. अशा प्रकारे त्यांनी दिलेल्या बँक खात्यात सुमारे 67 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. चौकशी पूर्ण होताच ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पुन्हा जमा केली जाईल असे सांगण्यात आले. मात्र नंतर त्याने कॉल केला नाही किंवा त्यांची पुन्हा चौकशी केली नाही. तसेच 67 लाखांची रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्स्फर केली नाही.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी घडलेला प्रकार त्यांच्या पत्नीला सांगितला. यावेळी तिने त्यांची सायबर ठगाकडून फसवणुक झाल्याचे सांगून त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी उत्तर सायबर प्रादेशिक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना पोलिसांनी ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. या माहितीवरुन या पथकाने गुजरात येथून वेदांत महंत, मोहित भुतैया आणि भाविक पटेल या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत या गुन्ह्यांत या तिघांचा सहभाग उघडकीस आला. चौकशीत फसवणुकीसाठी भाविक पटेलने एका खाजगी बँकेत अकाऊंट उघडून दिले होते. याच बँक खात्यात 4 लाख 80 लाख रुपये जमा झाले होते. ही रक्कम नंतर वेदांत महंतला देण्यात आली होती. वेदांत आणि भाविकमध्ये मोहित भुतैया याने मध्यस्थीची भूमिका पार पाडली होती. या गुन्ह्यांत तिघांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिघांनाही गुरुवार 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page