डिजीटल अटकेच्या भीतीने वयोवृद्ध महिलेला 7.80 कोटींना गंडा
सायबर ठगांना बँक खाती पुरविणारा तरुण गजाआड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 ऑगस्ट 2025
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे उघडकीस आल्याने डिजीटल अटकेची भीती दाखवून एका 81 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची 7 कोटी 80 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी कार्तिक चौधरी या तरुणाला दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. कार्तिक हा मालाडच्या मालवणीतील रहिवाशी असून त्याच्यावर फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. फसवणुकीची काही रक्कम त्याने उघडलेल्या बँक खात्यात जमा झाल्याने त्याने ती रक्कम सायबर ठगांना ट्रान्स्फर केली होती. त्यात त्याला काही रक्कम कमिशन म्हणून मिळाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
यातील तक्रारदार महिला वयोवृद्ध असून ती दक्षिण मुंबईत राहते. काही दिवसांपूर्वी तिला ट्रायसह गुन्हे शाखा आणि सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करुन अज्ञात सायबर ठगांनी तिच्या आधारकार्डवरुन बँकेत खाती उघडण्यात आल्याचे सांगितले होते. या बँक खात्यात मनी लॉड्रिंगची कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात तिचा सहभाग उघडकीस आल्याचा आरोप करुन तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. तिला डिजीटल अरेस्ट केल्याचे सांगून तिला कोणाशी संपर्क साधण्यास मनाई करण्यात आली होती. तिच्या बँक खात्याची माहिती घेऊन तिला विविध बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. चौकशीनंतर ही रक्कम तिच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे तिने त्यांनी दिलेल्या बँक खात्यात टप्याटप्याने सात कोटी ऐंशी लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर तिला कोणीही कॉल केला नाही, तिची चौकशी झाली नाही.
हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने तिच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. यावेळी त्यांनी तिची अज्ञात सायबर ठगांकडून फसवणुक झाल्याचे सांगून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन दक्षिण सायबर सेल पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची पोलिसांनी माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील एक बँक खाते कार्तिक चौधरी याच्या नावावर होते. तो मालाडच्या मालवणी परिसरात राहत असल्याने त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
तपासात कार्तिक हा काही सायबर ठगांच्या संपर्कात होता. त्यांच्यासाठी त्याने फसवणुकीसाठी बॅक खाती पुरविल्याचे उघडकीस आले. त्याच्या बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ही रक्कम त्याने सायबर ठगांना दिली होती. त्यामोबदल्यात त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. कात्रिक हा टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून या सायबर ठगांच्या संपर्कात होता. या सायबर ठगाने त्याच्यासह इतर व्यक्तींना विविध बँकेत खाते उघडण्यास तसेच त्या बँक खात्याची माहिती देण्यास सांगितले होते.
फसवणुकीची रक्कम याच बँक खात्यात जमा होत होती. त्यानंतर खातेदारांना ठराविक रक्कम कमिशन म्हणून दिल्यानंतर उर्वरित रक्कम ते सायबर ठगांना ट्रान्स्फर करत होते. या टेलिग्राम अॅपचा वापर केवळ बँक खात्याची माहिती घेण्यासाठी केला जात होता. ही रक्कम क्रिस्टो चलनात ट्रान्स्फर केली जात होती. त्यानंतर फसवणुकीची रक्कम विविध आशियाई देशात पाठविली जात होती. अटकेनंतर कार्तिकला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.